कोल्हापूर : माजी खा. एस. के. डिगे मेमोरियल फाउंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महू येथील जन्मघराची प्रतिकृती बिंदू चौकात उभारण्यात येणार आहे. भीम फेस्टिव्हलअंतर्गत हा उपक्रम असल्याची माहिती सदानंद डिगे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. आंबेडकर यांच्या १३० व्या व महात्मा फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त ११ ते १४ एप्रिल २०२१ या कालावधीत हा भीम फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. ११ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते या प्रतिकृतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यानिमित्ताने पुरस्कार वितरण, व्याख्यान, निबंध स्पर्धा, भोजनदान, वंचितांचा भेटवस्तू देऊन सत्कार, संविधान माहिती, प्रबोधनात्मक भव्य आतषबाजी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आ. ऋतुराज पाटील, आ. चंद्रकांत जाधव, प्रा. डॉ. अक्षता गावडे, अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, सहायक समाजकल्याण आयुक्त विशाल लोंढे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. १३ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता शाहू स्मारक येथे माजी आ. मालोजीराजे यांच्या हस्ते समाजरत्न भीमक्रांती पुरस्कारांचे वितरण होईल. पत्रकार परिषदेला योगेश डिगे, स्वप्नील डिगे, विकी माजगावकर, राजू नाईक उपस्थित होते.