आदित्य वेल्हाळकोल्हापूर : स्वत:साठी सगळेच जगतात; पण दुसऱ्यांसाठी व त्यांच्या उद्दारासाठी जे वेगळे मार्ग स्वीकारता त्यांच्या कार्याला समाज नक्कीच लक्षात ठेवतो. त्यामुळे हे कार्य आदर्शवत व प्रेरणादायी ठरते. भूतदया परमो धर्म: हे आयुष्याचे ध्येय मानणारी डॉ. सानिका सावंत पशुवैद्यकीय शिक्षण घेत असून, ही कोल्हापूरची मुलगी गुजरातच्या एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून भटक्या अपघातग्रस्त व रोगट प्राण्यांवर उपचार करून त्यांना नवजीवन देण्याचे काम करत आहे.आजोबा सुरेश शिपूरकर यांच्या संस्कारात वाढलेली सानिका. घरातील वातावरण सामाजिक चळवळीचे. मात्र, सानिकाला मांजराची, कुत्र्यांची प्रचंड आवड. आजोबांबरोबर एखाद्या आंदोलनाला गेली तर तेथील भटक्या प्राण्यांना शोधून त्यांना योग्य जागी ठेवण्याचे काम तिला आवडायचे. हळव्या मनाच्या सानिकाला सगळेजण यावरून चिडवायचे, पण तिने याकडे दुर्लक्ष करत आपली सेवा सुरूच ठेवली. सॅप संस्थेचे डॉ. संतोष वाळवेकर यांची प्रेरणा घेऊन सानिका कोल्हापूर शहरातील भटक्या प्राण्यांवर उपचार करत असे. हे काम करतानाच तिने पशुवैद्यकीय डॉक्टर बनण्याचे स्वप्न बाळगले व क्रांतिसिंह नाना पाटील कॉलेज ऑफ वेटरनरी सायन्स येथे प्रवेश घेतला. येथे शिक्षण घेत असतानाच ती जखमी मांजरानं घेऊन वसतिगृहात राहायची. मात्र, वसतिगृह प्रशासनाने तिला मांजरसोबत ठेवण्यास नकार दिल्याने तिने वसतिगृह सोडून ती दुसरीकडे राहण्यास गेली.
गीरच्या जंगल परिसरात सानिकाचे कार्यगुजरातच्या अमरेली जिल्ह्यात पशुवैद्यकीय डॉक्टर म्हणून सानिका काम करत आहे. गिर जंगलात सिंहाचा वावर मोठा आहे. सिंहामुळे जखमी होणारी जनावरे, प्राणी, म्हैशी यांच्यावर गावात जाऊन उपचार करण्याचे काम सानिका करते. रात्री, अपरात्री तिला जनावरांवर उपचारासाठी जावे लागते. मात्र. महिला म्हणून ती कधीही याचा बाऊ करत नाही. जनावरांच्या अंगावरील जखमा, किडे याचा तिरस्कार न करता ती सेवा म्हणून आपली भूमिका निभावत आहे. एक महिला ही काय काम करू शकेल यावर तेथील नागरिकांचा विश्वास नव्हता. मात्र, तिच्या आदर्शवत कामामुळे आता स्वत:हून लोक तिला बोलवतात.
पशुवैद्यकीय क्षेत्रात महिलांची संख्या कमी आहे. मात्र, प्राण्यांवर माझे प्रेम आहे. आपल्या स्पर्शातून, नजरेतून, बोलण्यातून, संवादातून ते प्राणी बरे होतात. त्यामुळे मला या क्षेत्रात काम करायला आवडते. मला कोल्हापुरात अशा जखमी, भटक्या जनावरांचे संगोपन करण्यासाठी मोठे केंद्र उभारायचे आहे. - डॉ.सानिका सावंत