प्रदीप शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राजेंद्रनगर झोपडपट्टीतील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेच्या वतीने १९७२ मध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यामंदिर क्र. ६५ सुरू केले. याच वर्षी दुष्काळ पडल्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात राजेंद्रनगर परिसरात स्थलांतर केले. त्यांची मुले पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणल्याने ही शाळा शैक्षणिक आधारवड म्हणूनच ओळखली जाते.राज्यात १९७२ साली पडलेल्या दुष्काळामुळे बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यांतील स्थलांतरित झालेले शेतमजूर, कामगार राजेंद्रनगर परिसरात वास्तव्यासाठी आले. येथे आल्यानंतर प्लास्टिक, भंगार गोळा करण्यासह गवंडीकाम, सेंट्रिंग तसेच मोलमजुरी करून पोट भरण्यास सुरुवात केली. परिस्थिती हलाखीची असल्यामुळे येथील पालकही मुलांना मदतीसाठी कामाला घेऊन जात होते. येथील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गुरुजींनी कंबर कसली. परिसरातील मुलांचा सर्व्हे करून त्यांची यादी तयार केली. शिक्षकांचे गट करून येथील परिसरात जाऊन शाळेच्या उपक्रमांची माहिती देण्याचे काम केले.झोपडपट्टीतील पालक सकाळी लवकर कामासाठी बाहेर पडत; तसेच सायंकाळी उशिरा घरी येत; यामुळे शिक्षकांनी पहाटे व रात्रीच्या अशा दोन वेळा निश्चित करून पालकांच्या घरी जाऊन शिक्षणाबाबत जनजागृती केली. तसेच मुलांना शाळेत सर्व गोष्टी मोफत दिल्या जातात, याची सविस्तर माहिती दिली; त्यामुळे पालकांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलू लागला.मराठी व सेमी-इंग्रजी अशी दोन्ही माध्यमे शाळेत असल्याने पहिले ते सातवीचे सुमारे ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही संख्या दरवर्षी वाढत आहे. या शाळेतील मुले शिष्यवृत्ती, कवायत स्पर्धा, क्रीडा स्पर्धेत कायम अव्वल ठरत असल्याने शाळेने वेगळी ओळख करून दिली आहे.देवस्थान समितीकडून शाळेत इ-लर्निंगसाठी एलईडी उपलब्ध करून दिला. शासनाच्या वतीने सुमारे दीड लाखांच्या अद्ययावत प्रयोगशाळेसाठी साहित्य उपलब्ध करून दिले आहे. शाळेमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसविले आहे. प्रतिमा सतेज पाटील यांनी मशीन मोफत दिले आहे. रोटरी क्लब आॅफ गार्गीजच्या वतीने मोफत सॅनिटरी नॅपकिन शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे मशीन भेट दिले आहे. सामान्य घरातील मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी नावीन्यपूर्ण, उपक्रम राबविल्याने प्रत्येक वर्षी विद्यार्थी पटसंख्या वाढत आहे.ज्ञानपेटी योजनाशाळा झोपडपट्टी परिसरात आहे. त्यामुळे काही पालकांना पेन, पाटी यांसारख्या वस्तू खरेदी करण्यासाठी काही वेळा पैसे नसतात. या वस्तू खरेदी करण्यासाठी मुलांनी मागणी केल्यास पालक मुलांना शाळा अर्धवट सोड असे म्हणतात. त्यामुळे कोणताही मुलगा शाळेपासून वंचित राहू नये यासाठी शाळेत ‘ज्ञानपेटी’ ही योजना सुरू केली आहे. शाळेमध्ये मुलांच्या वाढदिवसानिमित्त पालकांना चॉकलेट वाटण्याची सक्त मनाई आहे. त्या खर्चाऐवजी स्वइच्छेतून एखादे पुस्तक, वही, पेन किंवा शालेय साहित्य या पेटीत टाका असे आवाहन केले आहे. शाळेत येणारे प्रमुख पाहुणे किंवा शिक्षक या पेटीत शालेय साहित्य टाकतात. ते साहित्य गरजू विद्यार्थ्यांना दिले जाते.स्काऊट गाईडची पहिली शाळामहापालिकेच्या शाळेतील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यामंदिर, क्र. ६५ या शाळेत प्रथम स्काऊट गाईड स्थापन झाली आहे. या माध्यमातून मुलांचा आत्मविश्वास वाढविण्यासह सामाजिक जबाबदारी पेलण्याचे मार्गदर्शन केले जाते.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यामंदिर क्र. ६५ दुष्काळग्रस्त मुलांसाठी ‘आधारवड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:48 AM