लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी संलग्न संस्था प्रतिनिधींच्या नावांचे ठराव दाखल करण्यास सोमवारी सुरुवात झाली. तालुका उपनिबंधक, सहायक निबंधकांकडे हे ठराव सोमवार (दि. २२)पर्यंत दाखल करता येणार आहेत. त्याचबरोबर शंभर विकास संस्थांची प्रारूप यादीही प्रसिद्ध झाली आहे.
सहकार संस्थांची स्थगित केलेली निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. जिल्ह्यातील १०० विकास संस्थांचा मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर झाला असून, सोमवारी प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली. उद्या, बुधवारपर्यंत या याद्यांवर हरकती घेता येणार आहेत. साधारणत: मार्चअखेरीस या संस्थांसाठी मतदान होण्याची शक्यता आहे.
जिल्हा बँकेसाठी ठराव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सोमवारपर्यंत ठराव दाखल करता येणार आहेत. यामध्ये तीन दिवस सुटी असल्याने पाचच दिवस ठरावासाठी मिळणार आहेत. १२ मार्चला प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर हरकती व सुनावणी घेऊन ५ एप्रिलला अंतिम यादी प्रसिद्ध करावी लागणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन साधारणत: २५ मेदरम्यान मतदान होऊ शकते.