याबाबत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकारांना माहिती दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.१५ जानेवारीपर्यंत प्रसिद्ध केलेल्या विधानसभेच्या यादीच्या आधारे प्रभागनिहाय मतदारांचे विभाजन करून प्रभाग प्रारुप याद्या मंगळवारी प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गांधी मैदान, शिवाजी मार्केट, राजारामपुरी, ताराराणी मार्केट येथील विभागीय कार्यालयात त्या प्रसिद्ध करण्यात आल्या.
प्रारुप मतदार याद्यांवर दि. १६ ते २३ फेब्रुवारीअखेर हरकती व सूचना दाखल करण्यास मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत येणाऱ्या हरकतीवर सुनावणी घेऊन प्रभागनिहाय अंतिम यादी दि. ३ मार्च रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर दि. ८ मार्च रोजी मतदार केंद्रांची यादी, तर दि. १२ मार्च रोजी अंतिम प्रभागनिहाय व केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
-हरकतीनुसार होणारे बदल-
मतदार यादीवर प्राप्त होणाऱ्या हरकतींवर सुनावणी होऊन त्या योग्य असतील तर दुरुस्ती केली जाईल, असे सांगण्यात आले. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लेखनिकांच्या झालेल्या चुका दुरुस्त केल्या जातील. दुसऱ्या प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत झाले असतील तर ती दुरुस्ती केली जाईल. विधानसभेच्या मतदार यादीत नाव असूनही महापालिकेच्या प्रभाग यादीत नाव नसेल तर ते समाविष्ट केले जाईल. -
-मतदार संख्या अशी-
- २०११च्या जनगणेनुसार शहराची लोकसंख्या - ५ लाख ४९ हजार २३६
- सन २०१५ च्या निवडणुकीतील मतदार संख्या - ४ लाख ५३ हजार २१०
- सन २०२०च्या सार्वत्रिक निवडणुकीतील मतदार संख्या - ४ लाख ६२ हजार ६९३
वेबसाईटवर अडचण-
प्रारुप मतदार याद्या महापालिका वेबसाईटवर प्रसिद्ध केल्या; परंतु तांत्रिक अडचणीमुळे त्या पाहता येत नव्हत्या. एकाचवेळी अनेकांनी पाहण्याचा प्रयत्न केल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाल्याचे उपायुक्त रविकांत अडसुळ यांनी सांगितले. पेनड्राईव्हमधूनही मतदार याद्या देण्याची सोय करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.