कोल्हापूर : महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्या दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. येत्या रविवारपर्यंत हे सर्व काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठरविले आहे. त्यामुळे महापालिकेचे बहुतांशी कर्मचारी या कामात व्यस्त आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. ३ मार्च रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिध्द करायच्या आहेत. प्रारूप याद्यांवर हरकती घेण्याची मुदत मंगळवारी संपली. या मुदतीत तब्बल १८०० हरकती प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे सुमारे १५० हून अधिक कर्मचारी रात्रंदिवस हे काम करत आहेत.
प्रशासनाला प्राप्त झालेल्या हरकतींची छाननी करणे, प्रभागनिहाय नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांकडे त्या सूपूर्द करणे, त्यानंतर बीएलओमार्फत त्यातील चुका शोधणे, प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करणे अशा विविध टप्प्यांवर याद्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे महापालिका उपायुक्त रविकांत आडसूळ यांनी सांगितले.
प्रत्यक्षदर्शी हरकती जास्त असल्याचे दिसत असले, तरी तीन चार व्यक्तींनी एकाच चुकीवर हरकती दिल्या आहेत. हरकतींची पुनरावृत्ती झाली असल्यामुळे संख्या जास्त दिसत आहे. परंतु सर्व हरकतींची छाननी करण्यात येत असून, त्यामध्ये कोणत्याही चुका राहणार नाहीत, याची खबरदारी घेतली जात आहे, असेही आडसूळ यांनी सांगितले.