कोल्हापूर : महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव शुक्रवारी महानगरपालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार शहरातील पाच प्रभागांतील प्रगणक गट बदलण्यात आले असले तरी त्याचा परिणाम अन्य पाच प्रभागांवर झाला आहे. सदरचे १० प्रभाग कोणते याची माहिती मात्र गोपनीयतेच्या कारणास्तव देण्यास पालिका सूत्रांनी नकार दिला.
महानगरपालिकेची निवडणूक येत्या तीन-चार महिन्यांत होण्याची शक्यता आहे. निवडणुकीची पूर्वतयारी आयोगाकडून सुरू करण्यात आली आहे. शहरातील ८१ प्रभागांचे प्रारूप प्रभाग रचना प्रस्ताव ११ डिसेंबरपर्यंत सादर करण्याची सूचना आयोगाने केली होती. त्यानुसार महापालिका उपायुक्त निखिल मोरे तसेच प्रारूप प्रभाग रचनेची माहिती असलेले सचिन देवाडकर यांनी मुंबईत आयोगाच्या कार्यालयात सादर केली.
शहरातील ८१ प्रभागांतील पाच प्रभागांच्या रचनेत बदल करावे लागले आहेत. सात ते साडेसात हजार लोकसंख्या असलेला एक प्रभाग असावा असे निर्देश असल्याने त्यानुसार गेल्या पाच वर्षात वाढलेल्या लोकसंख्येचा विचार करून हे फेरबदल करण्यात आले आहेत. ज्या प्रभागाची लोकसंख्या साडेसात हजारांच्या पुढे आहे अशा प्रभागातील प्रगणक गट दुसऱ्या लगतच्या प्रभागाशी जोडण्यात आलेला आहे. शहरात असे पाच प्रभागांत बदल करण्यात आले असून त्याचा परिणाम अन्य पाच प्रभागांवर झालेला आहे. एक प्रगणक गट १२० घरांचा असून त्यातील लोकसंख्या ५०० ते ५५० इतकी आहे.
महापालिकेने तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर आयोगाकडून हरकती व सूचना मागविल्या जाणार आहेत. त्यावर सुनावणी होऊन अंतिम प्रभाग रचना तयार केली जाणार आहे.