कोल्हापूर : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरातील मणिकर्णिका कुंडाचे उत्खनन जतन व संवर्धन पुरातत्त्वीय संकेतांचा भंग न करता करण्यात यावे, पूर्व दरवाजातून येणारे सांडपाणी महापालिकेने स्वखर्चाने बाहेरून वळवून घ्यावे व मंदिराचे पावित्र्य अबाधित राखावे, अशी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली आहे. याबाबतचे निवेदन मंगळवारी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना देण्यात आले.
अंबाबाई मंदिर परिसरातील मणिकर्णिका कुंडावर शौचालय बांधलेल्या महापालिकेने त्यामाध्यमातून उत्पन्न मिळवले आहे. ती पूर्वस्थितीत मोकळी करून देणे ही त्यांचीच नैतिक जबाबदारी आहे. मंदिराच्या पूर्व दरवाजाच्या आतून सांडपाण्याची ड्रेनेजलाइन वळवण्यात आल्याने हे पाणी थेट मणिकर्णिका कुंडात जाते. हे कुंड संरक्षित स्मारक असल्याने त्याचे पावित्र्य राखले गेले पाहिजे. तसेच कुंडाच्या रचनेत फेरफार करणे, विद्रुपीकरण, धार्मिक भावना दुखावणे या तरतुदीअंतर्गत संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी शिवानंद स्वामी, किशोर घाटगे, राजू यादव, प्रमोद सावंत, ज्ञानेश्वर अस्वले, बाबासाहेब भोपळे, दीपक कातवरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
--
फोटो नं २४०८२०२१-कोल-मणिकर्णिका निवेदन
ओळ : कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने मंगळवारी मणिकर्णिका कुंडाच्या संवर्धनाबाबतचे निवेदन देण्यात आले.
---