कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यकारिणीतील नाट्यमय घडामोडींनंतर बुधवारी माजी अध्यक्ष मेघराज राजेभोसले पुन्हा महामंडळाचे अध्यक्ष झाले.मुंबईत झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत अध्यक्षांवरील अविश्वास ठराव आणि मागील सभेचे इतिवृत्त सात विरुद्ध सहाने नामंजूर झाल्याने नव्या अध्यक्ष निवडीचा विषयच सभेत आला नाही. अभिनेते सुशांत शेलार आणि निकिता मोघे यांच्या भूमिकेमुळे हा यू टर्न झाला.मनमानी कारभार आणि गैरव्यवहार करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचा ठपका ठेवत चित्रपट महामंडळाच्या कार्यकारिणीने २६ नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत अध्यक्ष राजेभोसले यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर करून धनाजी यमकर यांना प्रभारी केले होते. अध्यक्षांसह नव्या कार्यकारिणीची निवड करण्यासाठी बुधवारी दुपारी मुंबईत संचालकांची बैठक झाली.
यावेळी सतीश रणदिवे हे अध्यक्षपदासाठी अडून बसले. सुशांत शेलार यांच्या नावावर चर्चाच न झाल्याने त्यांनी ह्यमी अध्यक्ष होणारच नसेन तर मी विरोधात मतदान का करू?ह्ण अशी भूमिका घेतली. निकिता मोघे या पुण्याच्याच असल्याने त्यांनी यापुढे राजेभोसले हे सर्व संचालकांना विश्वासात घेऊन काम करणार असतील तर मी त्यांच्या बाजूने मत देईन, असे सांगितले.स्वत: राजेभोसले, सुशांत शेलार, निकिता मोघे, विजय खोचीकर, संजय ठुबे, चैत्राली डोंगरे, शरद चव्हाण यांनी इतिवृत्ताच्या विरोधात; तर अभिनेत्री वर्षा उसगावकर, धनाजी यमकर, बाळा जाधव, सतीश बिडकर, सतीश रणदिवे, पितांबर काळे यांनी बाजूने मत दिले. दोन तासांहून अधिक काळ बैठकीत झालेल्या या घडामोडीनंतर अध्यक्षांवरील अविश्वास ठराव नामंजूर करण्यात आला. त्यामुळे राजेभोसले हेच पुन्हा एकदा अध्यक्ष झाले.
संचालकांनी माझ्यावर पुन्हा विश्वास टाकला, त्याबद्दल मी आभारी आहे. आमच्यात काही गैरसमज होते, ते आता दूर झाले आहेत. यापुढे सर्वांना सोबत घेऊन महामंडळाचा कारभार करू.- मेघराज राजेभोसले,अध्यक्षअखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ