कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कर्मचाऱ्यांना ड्रेसकोडची सक्ती केली आहे; त्यामुळे एरव्ही वेगवेगळ्या कपड्यात दिसणाऱ्या कर्मचाऱ्यांचा लूक बदलला आहे. बोनस ८.५ टक्के देण्याचा निर्णय झाला होता, त्याऐवजी ९ टक्के दिला आणि त्यातून कर्मचाऱ्यानी दोन गणवेश घेण्याचा निर्णय झाला होता. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपासून शिपायापर्यंत गणवेश सक्तीचे केले असून, बुधवार सवलतीचा दिवस सोडून, इतर दिवशी गणवेश न घालणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.राष्ट्रीयकृत सह सर्वच सहकारी बॅँकांच्या कर्मचाऱ्यांचा ड्रेसकोड असतो. कामकाजातील शिस्त म्हणून याकडे पाहिले जात असल्याने जिल्हा बॅँकेनेही कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड करावा, अशी चर्चा बॅँकेच्या २०१७ - १८ च्या सर्वसाधारण सभेत झाली होती. त्यानुसार कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड सक्तीचा केला. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू केली आहे.
सवलतीचा दिवस सोडून अन्य दिवशी गणवेश परिधान न केल्यास प्रत्येक दिवसाला १00 रुपये व त्यावर १८ टक्के प्रमाणे जीएसटी अशी दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. गणवेश न घालणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अहवाल शाखाधिकाऱ्यांनी व्यवस्थापक व प्रशासन विभागास लेखी कळवायचे आहे. त्याची नोंद गोपनीय अहवालात होणार आहे.
तीन वेळा दंड भरूनही चौथ्यांदा गणवेश घातला नाही, तर संबंधित कर्मचाऱ्यांस कामावर हजर करून न घेता, सदर दिवसाची गैरहजेरी नोंद करून बिनपगारी करण्याच्या सूचना प्रशासनाने शाखाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अधिकारी, लिपिकांनी इनशर्ट व पायात बूट घालण्याची सक्ती आहे, तर शिपायांनाही पायात बुटाची सक्ती करण्यात आल्याने बॅँकेच्या कर्मचाऱ्यांचा एकदम लूक बदलला आहे.
पुढारीपण करणाऱ्यांची गोचीजिल्ह्यातील नेत्यांच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांचाच भरणा जिल्हा बॅँकेत अधिक आहे; त्यामुळे अपवाद वगळता बॅँकेचा कर्मचारी हा आपआपल्या गावातील राजकीय नेताच आहे; त्यामुळे त्यांचा पेहरावही पुढाऱ्यासारखाच असतो. या पुढारीपण करणाऱ्यांची मात्र या निर्णयाने गोची झाल्याची चर्चा बॅँकेच्या वर्तुळात सुरू आहे.
फिक्कट जांभळा शर्ट, काळी पँट व गुलाबी साडीपुरुष कर्मचाऱ्यांना फिक्कट रंगाचा जांभळा शर्ट व काळ्या रंगाची पॅँट दिली आहे. शिपायांना राखाडी रंगाचा ड्रेस दिला आहे. महिला कर्मचाऱ्यांना गुलाबी रंगाची साडी, तर जे कर्मचारी ड्रेस वापरतात त्यांना त्याच रंगाचे ड्रेस दिले आहेत.