लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गगनबावडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दारू पिऊन धिंगाणा घातलेल्या तीन पोलिसांना पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी तडकाफडकी निलंबित केले. करवीर पोलीस ठाण्यातील अमोल अनिल पाटील (वय २५, रा. शिंगणापूर, ता. करवीर), पोलीस मुख्यालयातील अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथकाकडील प्रवीण बाळासाहेब काळे (३५, रा. जुनी पोलीस लाईन, कोल्हापूर), गगनबावडा पोलीस ठाण्यातील इजाज गुलाब शेख (५२, रा. लाईन बझार, कसबा बावडा, कोल्हापूर) यांच्यावर ही कारवाई झाली.
याबाबत पोलिसांतून माहिती अशी की, इजाज शेख हा पोलीस खात्यात क्रीडा प्रशिक्षक आहे. दोन महिन्यांपूर्वी तो काही पोलीस कर्मचाºयांसह गगनबावडा येथे वर्षा पर्यटनासाठी गेला असताना त्याने तसेच अमोल पाटील, प्रवीण काळे यांनी अतिमद्यप्राशन केले. यानंतर प्रवीण काळे याच्या पायाला काच लागल्याने त्याला गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी या तिघांची अवस्था पाहून त्यांना आपल्या कक्षाबाहेरच थांबवून ठेवले. त्यामुळे संतप्त झालेल्या तिघा मद्यधुंद पोलिसांनी डॉक्टरांना शिवीगाळ करून त्यांच्याशी वादावादी केली. त्यानंतर तिघांनी डॉक्टरांच्या कक्षाबाहेरच लघुशंका केल्यामुळे जखमी काळे या पोलिसाच्या पायावर प्रथमोपचार करून त्यांना बाहेर काढले; पण हा प्रकार या रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाला होता.
घटनेनंतर १५ दिवसांनी संबंधित डॉक्टरांनी कोल्हापुरात येऊन थेट विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांची भेट घेतली व त्या घटनेचे सीसीटीव्हीचे फुटेज त्यांच्याकडे दिले. याबाबत नांगरे-पाटील यांनी पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांना चौकशीचे आदेश दिले.या घटनेची चौकशी शाहूवाडी-गगनबावडा पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी करून त्याबाबतचा अहवाल पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्याकडे आठवड्यापूर्वी सादर केला. त्या अहवालाच्या आधारे अधीक्षक मोहिते यांनी प्रवीण काळे, इजाज शेख आणि अमोल पाटील या तिघांचे तडकाफडकी निलंबन करण्याचे आदेश शुक्रवारी (दि. ८) रात्री उशिरा दिले. या घटनेमुळे पोलीस खात्यात खळबळ माजली आहे.इजाजचे दुसºयांदा, तर प्रवीणचे तिसºयांदा निलंबनइजाज शेख हा लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात सेवेत असताना ‘मटका’प्रकरणी त्याने कारवाईत कसूर केल्याप्रकरणी दोन वर्षांपूर्वी त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. त्यानंतर तीन महिन्यांनी त्याला पुन्हा सेवेत घेण्यात आले. आता दारू पिऊन धिंगाणा घातल्याप्रकरणी त्याच्यावर दुसºयांदा निलंबनाची कारवाई करण्यात आली; तर प्रवीण काळे याच्यावर दोन वर्षांपूर्वी अर्धनिलंबन तर गेल्या वर्षी पोलीस भरतीतील प्रकाराबद्दल त्याला निलंबित केले होते. त्यानंतर आता त्याच्यावर तिसºयांदा कारवाई केली आहे.संशयितांची नावे देण्यास टाळाटाळनिलंबनाच्या कारवाईचा आदेश शुक्रवारी रात्री उशिरा काढण्यात आला. निलंबित पोलिसांची नावे देण्यास जिल्हा पोलीस प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात होती. पण विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी याबाबत काही पोलीस अधिकाºयांची खरडपट्टी काढल्यानंतर मात्र ही नावे प्रसारमाध्यमांपर्यंत देण्यासाठी बाहेर पडली!पहिल्या दहा वर्षांतच ‘त्यांचे’ कारनामेनिलंबित झालेल्यांपैकी प्रवीण काळे याची पोलीस खात्यातील सेवा अवघी १० वर्षे झाली आहे; तर अमोल पाटील हा पाच वर्षांपूर्वी खात्यात रुजू झाला आहे. इजाज शेख याची खात्यातील सेवा २७ वर्षे झाली आहे.