इचलकरंजी : येथील तांबेमाळ परिसरात बेकायदेशीररीत्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या कारचालकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. निखिल आण्णासो चौगुले (वय ३०, रा. तांबेमाळ) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून एक लाख ५७ हजार ६१० रुपयांचा गुटखा आणि एक कार असा दोन लाख ७७ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती पथकाचे प्रमुख विकास जाधव यांनी दिली.
तांबेमाळ परिसरात एका चारचाकी गाडीतून मोठ्या प्रमाणात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ नेण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार त्या परिसरात सापळा रचून संशयावरून एमएच ०९ बीएक्स ६९६२ शेवरलेट ऑप्ट्रा ही कार पकडली. त्यामध्ये विविध कंपन्यांचा गुटखा मिळून आला आहे. सदरचा मुद्देमाल व चौगुले यास पुढील कारवाईसाठी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, खंडेराव कोळी, बालाजी पाटील, संजय इंगवले, आयुब गडकरी, सूरज चव्हाण, राजू कांबळे, यशवंत कुंभार यांच्या पथकाने केली.
(फोटो ओळी)
इचलकरंजीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेकायदेशीररीत्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या कारचालकास अटक केली. त्याच्याकडून मुद्देमालही जप्त केला.