सरदार चौगुलेपोर्ले तर्फ ठाणे : वाघबीळ घाट ते आवळी गावापर्यंत कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता चौपदरीकरणाच्या कामाची घाई सुरू आहे; परंतु रस्त्याच्या कामादरम्यान रस्तासुरक्षेच्या नियम व अटींचे पालन ठेकेदारांकडून होत नसल्याने वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे. राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या सुरक्षेची हमी नसल्याने वर्दळीच्या रस्त्यावरील वाहनाचा प्रवास राम भरोसे बनला आहे. संबंधित ठेकेदाराला दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारण विभागाने रस्ता सुरक्षेत होणाऱ्या हयगयीबाबत नोटीस काढली असतानाही रस्ते सुरक्षेबाबत ठेकेदाराला फारसे गांभीर्य नसल्याचे दिसून येते.
कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला गेल्या वर्षापासून सुरुवात झाली आहे. वाहतुकीच्या वर्दळीमुळे हा मार्ग अपघातासाठी नेहमी चर्चेत असतो. रस्त्याच्या कामामुळे त्यात भर पडली आहे.वाघबीळ घाटा ते बोरिवडेपर्यंत रस्त्याचे काम सुरू आहे. काम सुरू असलेल्या रस्त्याची कड ओळखण्यासाठी किंवा धोका दर्शविण्यासाठी बहुतांश ठिकाणी दुभाजक दिसून येत नाही. काठीचे दुभाजक मातीच्या ढिगात रुतवून त्याला रिबन बांधली आहे. वापरातील रस्ता आणि कामाच्या रस्त्यावर धोकादायक दर्शक लावलेले नाहीत. काही ठिकाणी रस्ता वळविण्याचे दिशादर्शक फलक नसल्याने मुख्य रस्ता आणि कच्चा रस्ता वाहनधारकांच्या लक्षात येत नाही.
आवळी गावच्या फाट्याजवळ खुदाई केलेल्या रस्त्याची माती रस्त्यावर टाकून त्याचे सपाटीकरण केले आहे. यामुळे रस्ताकामाच्या दर्जावर लोकांनी शंका उपस्थित केली आहे. बोरिवडे गावापासून पुढे मुख्य रस्ता वाहतुकीसाठी ठेवून दुतर्फा रस्त्याचे काम सुरू आहे. कच्च्या रस्त्यावर पाणी मारण्यात हयगय होत असल्याने धुळीचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावरील ओढ्यावर पूल, मोऱ्या बांधकामाच्या ठिकाणी दिशादर्शक, दुभाजक आणि धोका दर्शविणाऱ्या फलकाचा वापर कमी आहे. चौपदरीकरणाच्या रस्ते विकासकामाला घाई सुरू असली तरी वाहतुकीच्या सुरक्षेची ठेकेदारांकडून हमी दिसून येत नसल्याने प्रवाशांतून संताप व्यक्त होत आहे.वारंवार अपघाताचे प्रकारआवळी गावाजवळील ओढ्यावर पूल बांधण्याचे काम सुरू आहे. कच्च्या रस्त्यावर रविवारी पाणी मारण्याचे काम सुरू होते. दुचाकीवरून कोल्हापुरातील दाम्पत्य एक वर्षाच्या लहान मुलासह कोकरूडला चालले होते. पाण्यामुळे त्यांची दुचाकी घसरली. सुदैवाने यावेळी रहदारीच्या रस्त्यावरील दुर्घटना टळली. वर्दळीच्या रस्त्यावर धुलिकण, गाड्या घसरून होणारे अपघात आणि ठेकेदाराकडून रस्ता सुरक्षेबाबत होणारी हयगय यामुळे रस्त्यावरचा प्रवास वाहनधारकांना जीवघेणा ठरत आहे.