कोल्हापूर : नुकतीच आंध्रप्रदेश येथे बस व रेल्वे यांच्यात झालेल्या अपघातात २०हून अधिक विद्यार्थी ठार झाले. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर ही विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचालकांची शारीरिक व मानसिक तपासणी होणे गरजेचे असल्याचे मत पालकवर्गातून व्यक्त होत आहे. कोल्हापूर शहराचा विस्तार वाढला आहे. उपनगरात अत्याधुनिक शिक्षण देणाऱ्या प्राथमिक व महाविद्यालयीन शिक्षण संस्था उभारल्या जात आहेत. या शाळांत कोल्हापूर शहर तसेच आसपासच्या ग्रामीण भागातून रोज विद्यार्थी येतात. त्यांना ने आण करण्यासाठी त्या संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांची ठराविक ठिकाणांवरून शाळा किंवा कॉलेजपर्यंत वाहतूक केली जाते. दररोज हजारो विद्यार्थी अशा स्कूल बसमधून प्रवास करतात. या साऱ्यांचा जीव या बसचालकांच्याच हातात असतो. त्यामुळे त्यांची मानसिक व शारीरिक स्थिती योग्य असणे गरजेचे आहे. त्यामुळे या वाहनचालकांची आरोग्य तपासणी किमान तीन महिन्यांतून एकदा होणे गरजेचे असल्याचे मत अनेक पालकांनी ‘लोकमत’कडे फोन व प्रत्यक्ष भेटून व्यक्त केले. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात ३५० बसेस विद्यार्थी वाहतुकीकरता वापरण्यात येत आहे. या सर्व वाहनांमध्ये वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पीड गर्व्हनरही बसविण्यात आले आहेत. त्यानुसार शहरांतर्गत वाहतूक करणाऱ्या बसेसना ४० प्रती तास वेगमर्यादा, तर शहराबाहेर प्रवास करणाऱ्या बसेसना ५० इतकी वेगमर्यादा निश्चित केली आहे. असे असले तरी या बसचालकांची आरोग्य तपासणी महत्वपूर्ण असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले. या तपासणीवरुन चालक वाहन चालविण्यास कार्यक्षम आहे की नाही हे समजेल. त्याला शारीरिक काही त्रास असल्यास तोही या अहवालावरून समजणार आहे. त्यामुळे पुढील अनर्थ टाळण्यास मदत होईल. (प्रतिनिधी)
चालकांची आरोग्य तपासणी व्हावी
By admin | Published: July 27, 2014 12:48 AM