लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरातील वाहनचालक व पत्रकार यांना मोफत लस द्यावी, अशा मागणीचे निवेदन गुरुवारी जय संघर्ष वाहनचालक सामाजिक संस्था व शहरातील विविध वाहतूक संघटनेने प्रांत कार्यालयात दिले.
निवेदनात, कोरोना महामारीमुळे राज्यभर लॉकडाऊन होते. या काळात शहरामध्ये अत्यावश्यक सेवा म्हणून वाहनचालकांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून जनतेला दूध, भाजीपाला, फळफळावळ, रेशन, पाणी अशा जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा दिली होती. तसेच पत्रकारांनीही कोरोनाच्या काळात योद्धा म्हणून कामगिरी बजावली आहे. सध्या राज्यात कोरोनाचे प्रमाण पुन्हा वाढत आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव व्हावा, यासाठी शहरातील वाहनचालक व पत्रकार यांना मोफत लस मिळावी, असे म्हटले आहे. शिष्टमंडळात महादेवर गौड, चंदू पवार, विश्वास बचुटे, शिवानंद हिरेमठ, गणेश गायकवाड, प्रकाश लोखंडे तसेच क्रांतिकारी वाहतूक संघटना, छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना, छत्रपती शाहू महाराज टेम्पो संघटनांचे पदाधिकारी व सदस्यांचा समावेश होता.