कोल्हापूर : येथील लक्ष्मी गोल्ड बुलियन या कंपनीचे तीन किलो सोने, अडीच कोटी रोकड व एक कार असा तीन कोटी रुपयांचा मुंबईहून आलेला हवालाचा मुद्देमाल लुटण्याची टीप मालकाच्या कारचालकानेच दिल्याचे तपासांत निष्पन्न झाले आहे.
चालक झुंबऱ्या ऊर्फ राजू बळिराम कदम, त्याचे साथीदार भावड्या ऊर्फ संतोष ईश्वर मोरे, सोमनाथ यल्लाप्पा माने (तिघे, रा. दिघंची, ता. आटपाडी, जि. सांगली) यांची नावे निष्पन्न झाली आहेत. यापूर्वी पाचजणांना अटक केली आहे. गुन्ह्यात एकूण आठ आरोपींचा सहभाग असून, झुंबºयासह तिघांना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी दिली.
मुंबईहून आलेल्या १ कोटी १८ लाख रुपयांच्या हवालाच्या मुद्देमालाची लूटमार १४ जूनला झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी संशयित लक्ष्मण अंकुश पवार (रा. खटके वस्ती, लिंगीवरे, ता. आटपाडी, जि. सांगली), गुंडाप्पा तानाजी नंदीवाले (रा. तमदलगे, ता. हातकणंगले), अविनाश बजरंग मोटे (रा. शिवाजी चौक, हातकणंगले), अक्षय लक्ष्मण मोहिते (रा. आंबेडकरनगर, हातकणंगले), इंद्रजित बापू देसाई (रा. हातकणंगले) यांना अटक केली. त्यांच्याकडून ३२ लाखांची रोकड, ३० लाखांची सोन्याची बिस्किटे, कार व दुचाकी असा सुमारे ६७ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता.
लक्ष्मी गोल्ड बुलियन व्यवसायाचा मालक विकास विलास कदम (रा. आटपाडी, जि. सांगली) यांचा मुंबई, पुणे, बेळगाव, बंगलोर आणि केरळ अशा सहा ठिकाणी बुलियन व्यवसाय आहे. त्यांच्याकडे झुंबºया कदम हा चालक म्हणून दीड महिने कामाला होता. त्याला मोठ्या प्रमाणात रोख रकमेची व सोन्याचा व्यवहार होत असल्याची माहिती झाली होती. त्याने ही माहिती लक्ष्मण पवार याला सांगितली. त्यांनी गावातीलच साथीदार भावड्या मोरे, सोमनाथ माने यांना घेऊन मुंबई ते कोल्हापूर दरम्यान हवालाची रोकड व सोने लूटण्याबाबतचा कट रचला. यामध्ये पवार याचा नातेवाईक गुंडाची नंदीवाले याला सहभागी केले.
जून मध्ये हातकणंगले येथे पैसे व सोन्याची लूट कशाप्रकारे करायची याची बैठक झाली. त्यामध्ये नंदीवाले याने आणखी तीन साथीदार अविनाश मोटे, अक्षय मोहिते, इंद्रजित देसाई यांना सोबत घेऊन लूटमारीचा कट रचला. गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत, निरीक्षक सुनील पाटील व त्यांच्या टीमने केला.शेतात पुरले रोकड आणि सोनेलूटमारीनंतर आठही संशयितांनी अक्षय मोहिते याच्या घरी रोकड आणली. या ठिकाणी प्रत्येकाला रोकड व सोन्याची वाटणी केली. इंद्रजित देसाई हा जेसीबी मशीनवर चालक होता. त्याने स्पेअर पार्ट ठेवलेल्या शेतामध्ये विहिरीच्या शेजारील जमिनीत पैशाच्या दोन बॅगा पुरून ठेवल्या. त्यामध्ये एक कोटी सात लाख रुपये होते. गुंडाप्पा नंदीवाले याने रोपवाटिकेमध्ये झाडे ठेवण्यासाठी वापरलेल्या ट्रे मध्ये पैसे व सोने लपवून ठेवले. सुमारे ५६ लाख रुपये त्याने ठेवले होते. काहींनी नातेवाइकांच्याकडे पैसे ठेवायला दिले होते. करोडो रुपये लूटमारीमध्ये मिळाल्याने सगळेच भांबावून गेले होते. अजून ५० लाखांची रोकड आणि दोन किलो सोने हस्तगत करायचे आहे.रकमेबाबत विसंगतीकंपनीचे चिंतामणी पवार, सुशांत कदम व सागर सुतार हे कर्मचारी आहेत. ते मुंबईहून कोल्हापूरला अडीच कोटी रोकड आणि तीन किलो सोने गाडीतून घेऊन आले होते. या तिघांना फक्तवरती बॅगमध्ये दोन किलो सोने, ६७ लाखांची रोकड असल्याची माहिती होती. उर्वरित रोकडची माहिती नव्हती. ती कारच्या खाली गोपनीय कप्पे करून ठेवली होती. त्यामुळे रक्कम किती चोरीला गेली याची तिघांनाही कल्पना नव्हती. मालक विकास कदम हा आल्यानंतर हवालाची लूटमारीची रोकड आणि सोने स्पष्ट झाले. कदम यांनी ही रोकड सोने विक्रीतून मिळविली असल्याचे सांगितले आहे.