कोल्हापूर : के.एम.टी. उपक्रमाकडील चालक अत्यंत चांगल्या पद्धतीचे वाहन चालविण्याचे काम करीत आहेत. तरीही काही वाहन चालक बस रस्त्यावर अत्यंत वेगाने चालवतात. चालकांनी वेगाची मर्यादा राखणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी केले. के.एम.टी.च्या शाहू क्लॉथ मार्केट येथील प्रधान कार्यालयात ‘वाहतूक सुरक्षा’ अभियानाप्रसंगी ते बोलत होते.
गिरी म्हणाल्या, बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवासी व त्यांचेवर अवलंबून असणारे कुटुंब, रस्त्यावरून चालणारे पादचारी या सर्वांची जबाबदारी चालकावर असते. याकरिता झेब्रा क्रॉसिंग, ट्रॅफिक सिग्नल व वाहतुकीचे नियम यांचे काटेकोरपणे पालन करणे ही चालकाची जबाबदारी आहे. वाहन चालवताना मोबाइलचा वापर टाळावा. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील मोटार वाहन निरीक्षक प्रदीप शिंगारे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कार्यवाह प्रसाद बुरांडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी केएमटीचे जनसंपर्क अधिकारी, संजय इनामदार, वाहतूक निरीक्षक रघुनाथ धुपकर, अपघात विभागप्रमुख प्रदीप जाधव, चालक निदेशक गजानन लोळगे, सहायक वाहतूक निरीक्षक सुनील पाटील, वाहतूक निरीक्षक सुनील जाधव आदी उपस्थित होते.