इचलकरंजी : मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे कार चालवत एका मोटारसायकलला धडक देऊन न थांबता निघून जाणाऱ्या कारचालक युवकाला पोलिसाने फिल्मी स्टाईलने पाठलाग करत पकडले. दरम्यान, कारचालकाने एका विद्युत खांबाला धडक दिल्याने कारचा काही भाग तुटला होता. तरीही तो तशीच गाडी दामटत होता. अखेर स्टेशन रोडवरील महापालिकेच्या कमानीजवळ तो पोलिसांच्या हाती लागला. सिद्धार्थ श्रीकांत सगरे (वय २०, रा. कबनूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सुरू होते.याबाबत मिळालेली माहिती अशी, कारचालक सिद्धार्थ हा सोमवारी सायंकाळी स्टेशन रोडवरील आंबेडकर पुतळ्याजवळून निघाला होता. त्यावेळी त्याने एका मोटारसायकलस्वाराला धडक दिली. त्यामध्ये तो किरकोळ जखमी झाला. परंतु कारचालकाने अपघातस्थळी न थांबता पलायन केले. त्यावेळी समोरून पोलिस गाडी येत होती. पोलिस गाडी पाहताच त्याने पुन्हा गाडीची गती वाढवली. तेथून त्याने पळून जाण्यासाठी वळण घेताना एका विद्युत खांबाला धडक दिली. त्यामध्ये कारच्या एका बाजूचा चक्काचूर झाला. तशा स्थितीतही त्याने कार दामटली. तो थांबत नसल्याने संशय बळावल्याने गावभागचे पोलिसनाईक प्रमोद आंबी यांनी सायरन न वाजवता त्याचा पाठलाग सुरू केला. हा प्रकार पाहून काही मोटारसायकलस्वारही पोलिस गाडीच्या पाठीमागून आपली गाडी लावली. अखेर कमानीजवळ कारचालक पोलिसांच्या हाती लागला. तेथे नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिस आंबी यांनी त्याला ताब्यात घेतले आणि कारसह शिवाजीनगर पोलिसांच्या हवाली केले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. कारमध्ये मद्याची बाटली आणि खाद्यपदार्थ आढळले. त्यामुळे गाडी चालवताना तो मद्यपान करत असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.
Kolhapur: इचलकरंजीत नशेत बेदरकारपणे कार चालवत दुचाकी, खांबाला दिली धडक, चालकास पाठलाग करुन पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 3:21 PM