शिरोली : कोरडवाहू विकास योजना कासारवाडीत राबवून गावातील शेतकऱ्यांना फलोत्पादन, पशुसंवर्धन करता येईल, ही योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे, असे प्रतिपादन विस्तार कृषी विद्यावेत्ता विभागीय विस्तार केंद्राचे डॉ. अशोक पिसाळ यांनी केले. ते कासारवाडी येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत कृषिदिन कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शोभाताई खोत, तर पंचायत समिती सभापती डॉ. प्रदीप पाटील प्रमुख उपस्थित होते.
यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विलास करडे यांनी जैविक शेती, सेंद्रिय शेती या विषयासह ऊस पिकामध्ये सेंद्रिय पद्धतीचे व्यवस्थापन याविषयी सखोल मार्गदर्शन केले, तर उपविभागीय कृषी अधिकारी मकरंद कुलकर्णी यांनी ज्वारी पिकाचे नियोजन करून शेतातील खर्च कमी करून निव्वळ नफा वाढवावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाला टोपच्या सरपंच रूपाली तावडे, संभापूर सरपंच प्रकाश झिरंगे, तालुका कृषी अधिकारी अभिजित गडदे, मंडल कृषी अधिकारी नंदकुमार मिसाळ उपस्थित होते.
फोटो : ०४ कासारवाडी कृषीदिन
कासारवाडी येथील कृषी दिनाच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. अशोक पिसाळ. यावेळी सरपंच शोभाताई खोत, पंचायत समिती सभापती डॉ. प्रदीप पाटील आदी.