कऱ्हाड : ‘एमकेसीएल’च्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी दुष्काळ निर्मूलन अभियान हाती घेण्यात आले असून, ‘एमकेसीएल’ने नुकतीच दुष्काळमुक्ती ही नवीन वेबसाईट सुरू केली आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून दुष्काळी भागातील रोजगार हमी योजनेसह अन्य योजनांची माहिती गरजूंना मोफत मिळवून देण्यात येणार आहे. यासाठी ही मोफत माहिती देण्यासाठी पहिल्या टप्प्यात बीड येथे गुरुवार, दि. १० डिसेंबरला दुष्काळमुक्ती सेंटर सुरू करणार असल्याची माहिती ‘एमकेसीएल’चे कार्यकारी संचालक प्रा. विवेक सावंत यांनी दिली. कऱ्हाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ‘सनबीम’चे डायरेक्टर सारंग पाटील उपस्थित होते.प्रा. सावंत म्हणाले, ‘गेल्या तीन वर्षांपासूून अवर्षण, पावसाची अनियमितता आणि गारपीट अशा लागोपाठ झालेल्या नैसर्गिक आघातामुळे महाराष्ट्राच्या बहुतांश भागातील शेतीची अर्थव्यवस्था धोक्यात आलेली आहे. शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या सर्वांच्याच चरितार्थाचा प्रश्न गंभीर झालेला आहे. महाराष्ट्रातील दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. यातून दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी एम. के. सी. एल. ने दुष्काळमुक्ती ही नवीन वेबसाईड सुरू केली आहे. प्रत्यक्षात अनेकदा तांत्रिक अडचणीमुळे याच लाभ गरजूंपर्यंत पोहोचू शकत नाही. यातील वस्तुस्थिती लोकांकडून समजून घेण्यासाठी वेबसाईडची खूप मदत होणार आहे. यातून जॉबकार्ड, त्याचे नंबर, रोजगार हमीच्या कामांचा तपशील, त्यांचे पैसे यांची अद्ययावत माहिती वेबसाईडच्या माध्यमातून मिळणार आहे.‘एमकेसीएल’च्या माध्यमातून २५ लाख जणांना संगणक साक्षरता प्राप्त झाली असून, गतवर्षी सुरू करण्यात आलेल्या किल्क डिप्लोमाच्या माध्यमातून सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांना जगभरातून विविध रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत. यंदा या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे दोन लाख विद्यार्थी यामध्ये सहभागी होतील, असा अंदाज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ या उपक्रमाची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी ‘एमकेसीएल’ने सुमारे ५ हजार केंद्रांच्या माध्यमातून स्वखर्चाने ४ हजार कार्यक्रमांच्या माध्यमातून सुमारे २ लाख विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली आहे. (प्रतिनिधी)दुष्काळाची तीव्रता कमीतीन वर्षांपूर्वी दुष्काळी भागातील तलावांमधील गाळ काढण्याचे काम सनबीम समूह व एमकेसीएल यांच्या वतीने हाती घेण्यात आले होते. त्या काळीत सुमारे २० ठिकाणी हे काम करण्यात आले होते. त्याचा फायदा यंदा झाल्याचे दिसत आहेत. कमी पर्जन्यमान असतानाही संबंधित गावात तलाव पाण्याने भरले असूनही त्याठिकाणी दुष्काळाची तीव्रता कमी प्रमाणात जाणवत असल्याचे चित्र आहे, असेही प्रा. विवेक सावंत यांनी सांगितले.
रोजगाराच्या माहितीसाठी दुष्काळमुक्ती वेबसाईट
By admin | Published: December 03, 2015 9:46 PM