दीपक जाधव-लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यातील औषधांचा साठा करण्यासाठी असलेले औषध भांडार व नर्सिग ट्रेनिंग सेंटरचा वरिष्ठांकडून गैरवापर सुरू आहे.
लाईन बझार सेवा रुग्णालयाच्या मागे असणाऱ्या जागेत राज्य शासनाकडून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत बांधण्यात आलेले हे औषध भांडार आरोग्य उपसंचालक कार्यालयांच्या अधिपत्याखाली येत असून या भांडार गृहात चार जिल्ह्यातील औषध व लस ठेवली जाते. मात्र या औषध भांडारामध्ये आरोग्य उपसंचालक हेमंतकुमार बोरसे हे रहात असल्यामुळे शासनाकडून आलेल्या लहान मशिनरी या वापराविना पडून आहेत.
तत्कालीन आरोग्य उपसंचालक डॉ. पी. पी. धारुरकर हे मार्च २०१९ मध्ये निवृत्त झाल्यानंतर आठ महिने हे पद रिक्त होते.यानंतर डिसेंबर १९ मध्ये हेमंतकुमार बोरसे याच्याकडे लातूरसह कोल्हापूरचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. त्यांनी १२ डिसेंबर २०१९ ला कार्यभार घेतल्यानंतर ते शेंडा पार्कातील गेस्ट हाऊसमध्ये प्रतिदिन १०० रुपये भाडे भरून राहत होते. तिथे काही महिने राहिल्यानंतर ते मार्च २०२० च्या दरम्यान लाईन बझार येथील औषध भांडारगृहात राहण्यासाठी आले ते आजतागायत या औषध भांडारगृहात राहत आहेत.
याच आरोग्य उपसंचालक कार्यालयांच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी असलेल्या भावना चौधरी या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या नर्सिग ट्रेनिंग सेंटर मध्ये गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून राहत आहेत. त्यांना ह्या ट्रेनिंग सेंटरमध्ये राहण्यासाठी आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून रूम देण्यात आली आहे. त्या २२ नोव्हेंबर २०१८ मध्ये या कार्यालयात मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर त्या इतरत्र राहत होत्या दोन ते तीन महिन्यांपूर्वी आरोग्य उपसंचालक कार्यालयाने या ट्रेनिंग सेंटरची साफसफाई सीपीआरमधील काही कर्मचाऱ्यांकडून करून घेऊन त्यांना नियमबाह्य राहण्यासाठी दिली.
---------
साहेब नेमके गेले कुणीकडे..
या संदर्भात माहिती घेण्यासाठी बोरसे यांच्या कार्यालयात जाऊन स्वीय सहाय्यक अशोक बन्ने याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी साहेब लातूरला गेल्याचे सांगितले. सहाय्यक संचालक डाॅ. उज्ज्वला माने यांनी साहेब रत्नागिरीला गेल्याचे सांगितले. संध्याकाळी बोरसे यांच्याशी संपर्क झाल्यावर आपण सांगलीत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये होतो, असे त्यांनी सांगितले.
------------
कुलर मशिन हे १९ एप्रिलला मिळाले असून लाॅकडाऊनमुळे बसवता आले नाही. दोनवेळा पुणे कार्यालयाशी पत्रव्यवहार केला. सध्या पुण्यात मशिनची जोडणी सुरू आहे. त्यानंतर कोल्हापूरमध्ये होईल. जोडणी करताना काही साहित्य लागले तर दुकान उघडून ते देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली आहे.
हेमंतकुमार बोरसे.
आरोग्य उपसंचालक,कोल्हापूर.
----------
आरोग्य विभागाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी स्वतंत्र प्राचार्य असून त्यांनी किंवा माझ्या कार्यालयाकडून राहण्यासाठी अशी कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. कोण राहत असेल तर ते अनधिकृत आहे.
डाॅ. अनिल माळी.
जिल्हा शल्य चिकित्सक कोल्हापूर.
फोटो : २८०५२०२१-कोल-औषध भांडार
कोल्हापुरातील आरोग्य उपसंचालक कार्यालयांच्या अखत्यारीत येणाऱ्या याच औषध भांडारगृहात स्वत:च आरोग्य उपसंचालक गेली वर्षभर राहत आहेत. (छाया दीपक जाधव)
फोटो : २८०५२०२१-कोल-बंद कुलर
कोल्हापुरातील आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे औषधे ठेवण्यासाठी आलेला तीन कोटींचा कुलर तंत्रज्ञ मिळाला नाही म्हणून अजून जोडलेला नाही. तो औषध भांडार आवारातील झाडाखाली पडून असल्याचे वृत्त लोकमतने शुक्रवारी दिल्यावर तो कुलर असा प्लॅस्टिकच्या कागदात बांधून ठेवण्यात आला (दीपक जाधव)