कोल्हापुरात ढोल-ताशांचे आवाज दणदणायला लागले आहेत. म्हणजेच गणेशोत्सवाची चाहूल लागली आहे. अशाच एका ढोल-ताशा पथकाच्या सराव प्रारंभासाठी जाण्याचा योग आला. युवक आणि युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यांचे पालक, घरचे नातेवाईकही आले होते. त्यांच्याशी बोलता-बोलता आता शिकायच्या वयात ढोल-ताशामध्ये इतका वेळ घालवायचा हे काही मुला-मुलींच्या आई-वडिलांना पूर्णपणे मान्य नव्हते. व्यायाम हवा, खेळ हवा हे मान्य, पण दोन-चार महिने एवढा वेळ देणे गरजेचे आहे का? असा त्यांचा प्रश्न होता. या चर्चेतूनच मग मला पुढचा विषय गवसला. मुळात एक वेगळी वाट चोखाळल्याबद्दल मी या सर्व मुलांचे सुरुवातीलाच अभिनंदन केले. हल्लीच्या तरुणपिढीला बारीक-सारीक गोष्टींवरून टोमणे मारले जात असताना अनेक घरातील, वेगवेगळ्या परिस्थितीतील, विचारांच्या मुलांनी एकत्र येऊन ढोल- ताशासारखा उपक्रम राबविणे कौतुकास्पदच आहे. ही मुलं एकत्र येतात, दोन-तीन महिने सराव करतात, समाजातील मान्यवरांना भेटतात, त्यांचे सहकार्य घेतात, विविध कार्यक्रम आणि उत्सवांच्या निमित्ताने डोळ्यांचे पारणे फिटावे असे वादन करतात. शिवछत्रपतींचा घोष करत, अशा पद्धतीने हात उचलतात, कमरेची कमान करून मांडीने असा काही ढोल उचलतात की, बघणारा मंत्रमुग्ध होतो. भवानी मंडप असो किंवा महाद्वार रोड ज्या पद्धतीने ही मुले ही अदाकारी सादर करतात ते पाहून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थापच द्यावीशी वाटते. कोल्हापूर शहरात या दोन वर्षांत अशी आठ ते नऊ ढोल-ताशा पथके तयार झाली आहेत. केवळ ढोल आणि ताशा वाजवून ही मुले थांबत नाहीत. कुणी झाडे लावतात, ती जगवण्याची काळजी घेतात, कुणी गडकिल्ल्यांची स्वच्छता करतात, कुणी आजारी मुलांसाठी निधी उभारतात अशी अनेकविध समाजोपयोगी कामे या ढोल-ताशा पथकांच्या माध्यमातून सुरू आहेत. अनेक मुले-मुली एकत्र आल्यानंतर पालक काळजी व्यक्त करणारच, हे ओघानेच आले आणि इथेच मग या शिलेदारांची जबाबादारी जास्त वाढते. याच कार्यक्रमात ढोल-पथकातील एका मुलाच्या बहिणीने अतिशय चांगले मनोगत व्यक्त केले. ती म्हणाली की, या ढोल-ताशाच्या पथकामध्ये माझी मुलगी आहे म्हणजे ती सुरक्षितच असेल असा विश्वास त्या मुलीच्या पालकांच्या मनामध्ये निर्माण करणे हीच मोठी कामगिरी या मुलांनी करून दाखविण्याची गरज आहे. ज्या वयामध्ये क रिअरची जडणघडण करायची, मान मोडून अभ्यास करायचा, मन लावून प्रॅक्टिकल्स करायचे, पाठांतर करून अर्थशास्त्राचे सिद्धांत तयार ठेवायचे, कवितांचं रसग्रहण करायचं, मेकॅनिकल, सिव्हिल, सीएस, आयटी, टेलिकम्युनिकेश, प्रॉडक्शनचा अभ्यास करायचा, त्या वयात मुले आणि मुली ढोल-ताशा वाजवताहेत याचा त्रास पालकांना होतो आहे; परंतु एकीकडे आमच्या आवडीसाठी ढोल-ताशा वाजवताना दुसरीकडे सेमिस्टरमध्ये विषय राहणार नाही, गुणांचा आलेख चढता राहील याची काळजी याच मुलांना घ्यावी लागणार आहे. करिअरची आहुती देऊन ढोल-ताशा वाजवण्याची जशी गरज नाही, तशी केवळ आणि केवळ कॉलेज आणि क्लास करायचीही गरज नाही. याचा समतोल राखला तर मग कुणालाच तक्रारीला जागा राहत नाही. पूर्वी गावागावांमध्ये संध्याकाळच्या वेळी चावडीच्या दारात युवक जमायचे. कोपऱ्यात गवत पेटवले जायचे. त्याचा एक वेगळाच वास यायचा. हलगी कडकडायची. लेझीम हातात यायची. शिट्टीच्या इशाऱ्याप्रमाणे लेझीम खेळत खेळत पोरं घामाने निथळून जायची. गावातील मिरवणुकीत, वरातीसमोर गोंड्याची टोपी घालून लेझीम खेळणारी पोरं लक्ष वेधून घ्यायची. करंड्या वाजवणारी, इरल्याची घोडी नाचवत जमिनीवर टाकलेली नोट वाकून कपाळाला चिकटवून वर उठणारा बहाद्दर टाळ्या घेऊन जायचा. नंतर बेंजो पथक आलं. बुलबुलतरंगवरून फिरणाऱ्या सराईत हाताला दाद मिळायची. आता चावडीत गावसभेला जिथं ग्रामस्थ येत नाहीत, तिथं लेझीम तर बाजूलाच. आता तिठ्ठ्यांवर पोरं एकत्र येतात, पण एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून माना वाकवून बहुरंगी क्लिप्स बघण्यातच त्यांचा अधिक वेळ जायला लागलाय हे वास्तव आहे. मग पुन्हा एकदा महाराष्ट्राचे खेळ, संस्कृती, लोककला, मर्दानी खेळ, वादन प्रकार टिकवायचे असतील तर अशी मुलं आणि मुली पुढं आल्या तरच ते शक्य आहे. कुणीतरी जाणीवपूर्वक वेळ दिला तरच या गोष्टी शक्य आहेत. फक्त वेळ व काळाचे भान ठेवत आणि शिस्त पाळत ढोल आणि ताशा वाजवत वाजवत आयुष्याचं गाणं सुरेल करण्यासाठी प्रयत्न व्हावेत हीच यानिमित्ताने अपेक्षा...- समीर देशपांडे
ढोल-ताशा
By admin | Published: July 04, 2017 12:32 AM