कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख धरण असलेल्या दूधगंगा (काळम्मावाडी) प्रकल्पाची गळती काढण्यासाठी शंभर टक्के मदत केली जाईल तसेच आक्टोबरमध्ये पाऊस संपताच या गळती काढण्याच्या कामास सुरवात होईल, अशी स्पष्ट ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी येथे बोलताना दिली. गळती काढण्यास ८० कोटी रुपयांचा खर्च असून चांगला ठेकेदार मिळाला तर यातील पन्नास टक्के रक्कम तातडीने उपलब्ध करुन देऊ, असेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री पवार सोमवारी रात्री कोल्हापुरात आले होते, सोमवारी रात्री तसेच मंगळवारी सकाळी जिल्ह्यातील काही प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांना काळम्मावाडी धरणाच्या गळतीचा विषय लक्षात आला. सोमवारी दूधगंगा प्रकल्प कृती समितीच्या कार्यकर्त्यांनीही पवार यांची भेट घेऊन त्यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
त्यांनी सांगितले की, दूधगंगा प्रकल्पाच्या गळतीची विषय गंभीर आहे. २६ टीएमसीचे धरण असताना २१ टीएमसी पाणी साठविले जात आहे. गळतीचे प्रमाण प्रचंड आहे. ते बंद करण्याचे काम एक वर्षात होणार नाही. मी आज सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली. धरणातील गळती दूर करण्यासाठी ८० कोटी रुपयांचा खर्च आहे. गळती दूर केल्यावर प्रत्येक वर्षी पाच टीएमसी पाणी वाढणार आहे. शेतीच्या तसेच पिण्याच्या पाण्याची नितांत गरज लक्षात घेता गळती थांबविण्याशिवाय गत्यंतर नाही. आपणाला हा प्रश्न सोडवायचा आहे. म्हणून राज्याचा उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री या नात्याने मी ठरविले आहे की, मुंबईत गेल्यावर तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करणार आहे.
आक्टोबरपासून कामाला सुरवात
आपल्याकडे साधारण आक्टोबरमध्ये पाऊस संपतो. पाऊस संपल्यानंतर गळती काढण्याच्या कामाला सुरवात करता येईल, हा विषय मार्गी लावायचा निर्णय मी आजच स्वातंत्र दिनाच्या निमित्ताने घेतला असल्याचे सांगून पवार म्हणाले की, काहीही झाले तरी गळती थांबविण्याचा निर्णय आपण घेतला असल्याने यंदाच्यावर्षी पन्नास टक्के निधी या कामाकरिता उपलब्ध करुन देण्यात येईल, उर्वरित निधी पुढील वर्षी देण्यात येईल.