कोल्हापूर : प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून ५० हजार नोंदणी झाली पाहिजे. गावागावात जाऊन प्रत्येक माणसाला शिवसेनेशी जोडा, यामध्ये कोणी हयगय केली तर खपवून घेणार नाही. पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर यांनी केले.
शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा प्रारंभ शनिवारी दुधवडकर यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा प्रमुख संजय पवार म्हणाले, आपल्यामुळे शिवसेना नाहीतर शिवसेनेमुळे आपण असल्याचे भान ठेवा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कामाने संपुर्ण महाराष्ट्र प्रभावीत झाला असताना काही मंडळी टीका करत आहेत. मात्र त्यांनी आपली घरे सांभाळावीत, असा टोलाही त्यांनी लगावला.विजय देवणे म्हणाले, सदस्य नोंदणीत कोल्हापूर जिल्हा राज्यात आघाडीवर राहण्यासाठी कंबर कसावी. आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणूकीसाठी पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे.
आमदार प्रकाश आबीटकर यांनी मनोगत व्यक्त केले. गोकुळचे संचालक अंबरीष घाटगे, उपजिल्हाप्रमुख बाजीराव पाटील, सुजीत चव्हाण, शिवाजीराव जाधव, शुभांभी पोवार, प्रा. सुनील शिंत्रे, मंजीत माने आदी उपस्थित होते. दिलीप माने यांनी आभार मानले.