लोकमत न्यूज नेटवर्कपन्हाळा : आधारच्या सक्तीने शालेय क्रीडा स्पर्धांतील बोगस खेळाडू मैदानाबाहेर फेकले गेल्याने पात्र खेळाडूंना संधी मिळत आहे. यावर्षीच्या पन्हाळा तालुक्यातील शालेय क्रीडा स्पर्धेतून हे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे पात्र खेळाडूंमध्ये उत्साह निर्माण झाला असून ‘आधार’च्या सक्तीचे पन्हाळा तालुक्यातील शालेय खेळाडूंच्या वतीने स्वागत होत आहे.दरवर्षी शालेय क्रीडा स्पर्धा जूनच्या दुसºया आठवड्यात शाळा सुरू झाल्यापासून एक महिन्यानंतर म्हणजे १५ जुलैच्या आसपास सुरू होतात. या स्पर्धेत किमान तीन शाळांनी सहभाग नोंदविणे सक्तीचे आहे. या स्पर्धा जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रत्येक तालुकावार घेतल्या जातात. या स्पर्धेत ज्या शाळेचा संघ विजेता झालेला असतो तो संघ त्या त्या तालुक्याचे प्रतिनिधित्व जिल्हास्तरावर करतो. यावर्षी तालुका स्पर्धेत सहभाग नोंदविताना प्रवेशिका व ओळखपत्रामध्ये आधार क्रमांक घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. अनेकवेळा आपल्याच विद्यालयाचा संघ विजयी व्हावा यासाठी मोठ्या वयोगटातील खेळाडू किंवा मंडळांच्या खेळाडूंना संघात खेळवण्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे शाळेतील पात्र खेळाडूंवर अन्याय होत होता. बोगस खेळाडूंपुढे पात्र खेळाडूंचा वयाने लहान असणाºया खेळाडूंचा कस लागत नव्हता. खेळाचे कौशल्य असूनदेखील बोगस व वयाने मोठे असणाºया खेळाडूंपुढे निभाव लागत नव्हता. परिणामी सततच्या पराभव व अन्यायामुळे खचून जाऊन पात्र खेळाडू स्पर्धेत सहभाग सोडाच खेळालाच रामराम करीत होते.हे चित्र बदलण्यासाठी क्रीडा विभागाने आधारकार्ड सक्तीचा निर्णय घेतला. याचा सकारात्मक परिणाम या वर्षीच्या पन्हाळा तालुक्यातील शालेय स्पर्धेत दिसून आला. बनावट खेळाडू तसेच वय लपवून दिशाभूल करणाºया खेळाडूंना यावेळी पायबंद बसला आहे. या शालेय विविध क्रीडा प्रकारातील स्पर्धेत सर्व बोगस खेळाडू मैदानाबाहेरफेकले गेले आहेत. स्पर्धेतील उत्साह व ईर्षा समवयस्क खेळाडूंमुळे वाढली असून विविध खेळ प्रकारात अटीतटीच्या लढती पाहावयास मिळत आहेत.
आधारकार्डमुळे बोगस खेळाडूंना घरचा रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 11:46 PM