कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरूडॉ. देवानंद शिंदे यांच्यावर गैर आणि बेकायदेशीर कारभाराचे आरोप करीत शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) ‘कुलगुरू हटाव’ आंदोलन सुरू केले आहे. त्या आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून सुटातर्फे शुक्रवारी दुपारी दोन ते सायंकाळी पाच यावेळेत दसरा चौकात ‘जनजागरण धरणे आंदोलन’करण्यात आले.आंदोलनस्थळी सुटाचे पदाधिकारी आणि सदस्य प्राध्यापकांनी ‘मनमानी व बेकायदेशीर कारभार करणाऱ्या कुलगुरुंना हटविले पाहिजे’, ‘विद्यार्थी हिताकडे दुर्लक्ष करणाऱ्या कुलगुरुंचा धिक्कार असो’, अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला. त्यानंतर झालेल्या सभेत सुटाचे प्रमुख कार्यवाह प्रा. डी. एन. पाटील, सहकार्यवाह सुभाष जाधव यांनी मार्गदर्शन केले. आंदोलनाच्या पुढील टप्प्यांची माहिती त्यांनी दिली.या आंदोलनात सुटाचे प्रमुख कार्यवाह प्रा. डॉ. डी. एन. पाटील, उपाध्यक्ष अरुण पाटील, आर. के. चव्हाण, खजिनदार इला जोगी, ज्येष्ठ सल्लागार प्रा. सुधाकर मानकर, टी. व्ही. स्वामी, सयाजी पाटील, राज्य कर्मचारी संघटनेचे अनिल लवेकर, माध्यमिक शिक्षक संघाचे राजेश वरक, प्राथमिक शिक्षक समितीचे संजय पाटील, विद्यापीठ बचाव कृती समितीचे सदस्य, सुटाचे कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील सदस्य प्राध्यापक सहभागी झाले. आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने कुलपती आणि उच्च शिक्षण मंत्री यांना पाठविण्याचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना दिले.