कोल्हापूर : लाचप्रकरणी अटक होण्याच्या भीतीने महापौर तृप्ती अवधूत माळवी (वय ३३, राजारामपुरी, पाचवी गल्ली) या रक्तदाब वाढल्याचे कारण पुढे करून आज, शनिवारी सकाळी राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात दाखल झाल्या. त्यामुळे त्यांना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम पथकासह रिकाम्या हाताने परतल्या. दरम्यान, माळवी यांनी आज सायंकाळी राष्ट्रवादीचे गटनेते सुहास लाटकर यांच्याकडे आपला महापौरपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यांचा स्वीय सहायक अश्विन गडकरी याला न्यायालयात हजर केले असता प्रकृती बिघडल्याच्या कारणावरून त्याची २० हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली. तसेच त्याला तीन दिवस शनिवार पेठेतील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात सकाळी अकरा वाजता हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, माळवी यांचा रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी किमान ४८ तास डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडले जाईल. त्यानंतरच त्यांची चौकशी करून गुन्ह्यामध्ये सहभाग स्पष्ट झाला, तर त्यांना अटक केली जाईल, असे पोलीस उपअधीक्षक उदय आफळे यांनी सांगितले. शिवाजी पेठेतील पर्यायी जागा देण्यासाठी तक्रारदार संतोष हिंदुराव पाटील यांच्याकडून १६ हजारांची लाच स्वीकारल्याच्या संशयावरून महापौर माळवी व त्यांचा खासगी स्वीय सहायक अश्विन मधुकर गडकरी (वय ४०, रा. राजाराम रेसिडेन्सी, संभाजीनगर) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले होते. या घटनेमुळे जिल्ह्यासह राज्यात खळबळ माजली. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महिलांना सायंकाळनंतर अटक करता येत नसल्याने माळवी यांना जाबजबाब घेऊन रात्री घरी जाऊ दिले होते. तर स्वीय सहायक गडकरी याला अटक करून करवीर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवले. आज सकाळी लाचलुचपत विभागाच्या उपअधीक्षक पद्मा कदम या सहकार्यांना घेऊन माळवी यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या असता रक्तदाब वाढल्याने त्यांना राजारामपुरीतील एका खासगी रुग्णालयात दाखल केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यानुसार पथकाने रुग्णालयात जाऊन माळवी यांची विचारपूस केली. तेथील डॉक्टरांशी त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली असता त्यांचा रक्तदाब वाढला असून, तो नियंत्रणात आणण्यासाठी किमान ४८ तास निरीक्षणाखाली ठेवावे लागेल, असे सांगितले. यावेळी त्यांचा वैद्यकीय रिपोर्ट पाहून पथक माघारी परतले.
अटकेच्या भीतीने महापौर रुग्णालयात दाखल
By admin | Published: February 01, 2015 1:21 AM