कोल्हापूर , दि. २१ : निसर्गमित्र, शिवाजी मराठा हायस्कूल, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संस्थांनी ‘फटाकेमुक्त दिवाळी’साठी राबविलेल्या विविध प्रबोधनपर उपक्रमांचा सकारात्मक परिणाम झाला आहे. यावर्षी फटाके वाजविणे टाळणाऱ्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसत आहे. पर्यावरणपूरक दिवाळीला कोल्हापूरकरांचा वर्षागणिक प्रतिसाद वाढत आहे.
हवा आणि ध्वनी प्रदूषणात फटाक्यांमुळे भर पडते. त्यामुळे आरोग्य बिघडते. ते टाळण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूरमध्ये फटाके टाळून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी व्हावी, यासाठी विविध संस्था प्रबोधन करीत आहेत.
यातील निसर्गमित्र संस्था फटाके न वाजविणाऱ्या मुलांसाठी निसर्गसहल काढते. त्यासह या संस्थेमार्फत विद्यार्थी हे व्यापाऱ्याना ‘दीपावली पाडवा व लक्ष्मीपूजनाचा आनंद फटाके न वाजवता मिठाई वाटून साजरा करूया,’ अशा आशयाची पत्रे पाठवितात.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शालेय विद्यार्थ्यांना संकल्पपत्र पुरवून ‘फटाकेमुक्त दिवाळी’ साजरी करण्याची शपथ देण्याचा उपक्रम राबविते. शिवाजी मराठा हायस्कूलमधील विद्यार्थी हे फटाके वाजविणे टाळून त्यातून बचत होणाऱ्या पैशांमधून त्यांच्या शाळेतील गरीब मित्र-मैत्रिणीला दिवाळीची कपडे भेट देतात.
या संस्थांतर्फे गेल्या १० ते १५ वर्षांपासून हे उपक्रम राबविण्यात येत आहेत. काही व्यक्ती या वैयक्तिकपणे फटाक्यांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करतात. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा फटाके वाजविणाऱ्याचे प्रमाण कमी झाल्याचे जाणवत आहे.
चांगली साथगेल्या दहा-बारा वर्षांपासून ‘निसर्गमित्र’सह विविध संस्थांनी शालेय विद्यार्थ्यांचे फटाकेमुक्त दिवाळीसाठी प्रबोधन केले. त्याचा चांगला परिणाम झाला असल्याचे ‘निसर्गमित्र’चे कार्यवाह अनिल चौगुले यांनी सांगितले. ते म्हणाले, प्रदूषण करणारे फटाके लावणे लोक स्वत:हून टाळत आहेत. त्याऐवजी अनेकांनी शोभिवंत फटाक्यांच्या वापरावर भर दिला आहे.काहीजणांनी सामाजिक उपक्रमांना बळ दिले आहे. पर्यावरणपूरक दिवाळीबाबतच्या आमच्या उपक्रमांना नागरिकांची चांगली साथ मिळत आहे. प्रबोधन आणि नागरिकांचे पाठबळ यांमुळे कोल्हापूरची ‘फटाकेमुक्त दिवाळी’च्या दिशेने यशस्वीपणे वाटचाल सुरू आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी दिवाळी सुरू झाल्यापासूनचे चित्र पाहता फटाके कमी वाजत असल्याचे दिसून येत आहे. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने कोल्हापूरकरांचे एक चांगले पाऊल या माध्यमातून पडत आहे. शहरातील विविध भागांत दिवाळीत फटाक्यांच्या आवाजाची निरीक्षणे नोंदविण्याचे काम आमच्या विभागाकडून सुरू आहे. येत्या चार दिवसांत त्याचा अहवाल तयार केला जाईल.- डॉ. पी. डी. राऊत,पर्यावरण विभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ