म्हाकवे : साखर केंद्र शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची बलस्थाने असणारी साखर कारखानदारी मोडीत निघणार आहे. शासनाच्या दुहेरी भूमिकेमुळे साखर कारखानदारी आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व घटकांना फटका बसणार असल्याचा इशारा देत, शासनाने हे निर्बंध घालताना फेरविचार करावा, असे आवाहन सदाशिवराव मंडलिक कारखान्याचे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक यांनी केले आहे.शासनाने सप्टेंबर २0१६ अखेर एकूण साखरेच्या ३७ टक्के आणि ३१ आॅक्टोंबरपर्यंत २४ टक्केच साखरसाठा शिल्लक असावा, असे आदेश कारखान्यांना दिले आहेत. यापेक्षा अधिक साखरसाठा करणाऱ्या कारखान्यांवर कारवाईचे संकेत शासनाने दिले आहेत.शासनाच्या या निर्बंधामुळे बाजारात साखर मोठ्या प्रमाणात विक्रीला आल्याने साखर दरात घसरण होणार आहे. याचा थेट आर्थिक फटका कारखानदार आणि त्या अनुषंगाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही बसणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाने तोट्यात चालविले जात असताना शासन सर्व निर्बंध आणि कर या उद्योगावरच लावत आहे. ही दुर्दैवाची बाब असल्याचेही प्रा. मंडलिक यांनी पत्रकात म्हटले आहे. (वार्ताहर)२0१४-१५ व २0१५-१६ या हंगामात कारखानदारी मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत आली होती. शेतकऱ्यांची एफआरपी देण्यासाठी शासनाने दिलेल्या कर्जाचे हप्तेही कारखान्यांना अदा करावे लागणार आहेत. अशावेळी साखर दराची थोडीफार मदत होती. साखर कारखानदारीच्या उभारीमुळेच पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आर्थिक सक्षम झाला आहे; परंतु शेतकऱ्यांची बलस्थाने असणारी साखर कारखानदारी केंद्राच्या दुहेरी धोरणामुळे मोडीत निघणार आहे. एका बाजूला एफआरपीप्रमाणे उस दर देण्याचे आदेश व दुसऱ्या बाजूला साखरसाठ्यावर निर्बंध, यामुळे बाजारातील साखरेच्या दराचा विचार न करता ती विकावी लागणार आहे.
दुहेरी निर्बंधामुळे साखर कारखानदारी मोडेल
By admin | Published: September 27, 2016 10:55 PM