भीमगोंडा देसाई-- कोल्हापूर -जिल्ह्यात सध्या ग्रामीणपेक्षा शहरातील नागरिकांना रोज दरडोई पाणी दुप्पट मिळत असल्याचे प्रशासनाने तयार केलेल्या पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यातून स्पष्ट होते तरीही शहरातील काही भागात पाणी पुरेशा प्रमाणात येत नाही, कमी दाबाने येते अशी सार्वत्रिक तक्रार आहे. उपलब्ध पाण्यातून प्रशासनाने १५ जूनपर्यंत पिण्यासाठी पाणी देण्याचे नियोजन केले आहे; परंतु, अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर नियोजनशून्य कारभारामुळे पाणीटंचाईला सामारे जावे लागत आहे. बेसुमार नासाडी, वेळेत गळती काढणे यावर वचक नसल्याचेही समोर येते आहे.यंदा पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. परिणामी जिल्ह्यातील तलाव पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. भूगर्भातील पाणीपातळी खालावल्याने अनेक विंधन विहिरी आटल्या. विहिरीतील पाण्याने तळ गाठला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदी व तलावावर उपसा बंदी करून उपलब्ध पाणी पिण्यासाठी राखीव केले. नियोजनात कोल्हापूरसह सर्व नगरपालिका, नगरपरिषद हद्दीतील लोकांना कमीत कमी ५० ते अधिकाधिक १७० लिटर पाणी दरडोई मिळते. याउलट ग्रामीण भागातील लोकांना कमीत कमी २० आणि अधिकाधिक ७० लिटर पाणीपुरवठा दरडोई केला जात आहे.जिल्ह्यातील ग्रामीण भागात जवळचे तलाव, सार्वजनिक विहिरी, विंधन विहीर, नदी यांच्यातून पाणी पिण्यासाठी पुरवठा होतो. कोल्हापूर शहरात राधानगरी धरणातून पाणीपुरवठा होतो. टंचाईमुळे गेल्या दोन आठवड्यापासू एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. दरडोई १३५ ऐवजी १७० लिटर पाणी दिले जात आहे. राधानगरी धरणात पिण्यासाठी ०.४३६ टीएमसी पाणीसाठा राखीव आहे. इचलकरंजी शहरासाठी कृष्णा नदीतून पाणीपुरवठा होतो. या नदीतील पिण्यासाठी २२ दशलक्ष घनमीटर पिण्यासाठी आरक्षित आहे. कृष्णेत पिण्यासाठी पाणी सोडण्यासाठी पंचगंगा नदीत ८.५ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित आहे. जयसिंगपूर शहरवासीयांना पिण्यासाठी कृष्णा नदीत १.९९ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित आहे. कागल शहरास दूधगंगा नदी, जयसिंगराव तलाव येथून पाणीपुरवठा होतो. मात्र, पुरेसा पाणीसाठा नसल्याने सध्या जयसिंगराव तलावातून उपसा बंद आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ‘दूधगंगा’वर जॅकवेलमध्ये वाढीव क्षमतेचा पंप बसविण्यात आला आहे. ‘दूधगंगा’त १०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित केले आहे. गडहिंग्लज शहरास हिरण्यकेशी नदीतून पाणीपुरवठा होतो. पिण्यासाठी या नदीत २ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित आहे. आवश्यकतेनुसार ते चित्री धरणातून हिरण्यकेशीत पाणी सोडले जात आहे. रोजचे पाणी वितरणदरडोई रोज होणारा पाणीपुरवठा लिटरमध्ये असा : ग्रामीण जनता - २० ते ७०, कोल्हापूर शहर (एक दिवस आड) - १७०, इचलकरंजी -८०, जयसिंगपूर - ११०, कागल - ५०, गडहिंग्लज - १३५, मलकापूर - ७०, मुरगूड -१००, कुरुंदवाड - ९०, पन्हाळा - ७०.नगरपालिकांसाठी आरक्षित पाणीमलकापूर शहरातील पाणीपुरवठ्यासाठी कडवी नदीतील ०.३९५ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित आहे. मुरगूड शहरास सर पिराजीराव तलावातून पाणीपुरवठा होतो. या तलावातील शेतीसाठी वापरणाऱ्या पाण्यावर निर्बंध आणल्यास जुलैपर्यंत मुरगूडला पाणी मिळेल इतका पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. कुरुंदवाड शहरासाठी कृष्णा-पंचगंगा नदीमधील १.८४८१ दशलक्ष घनमीटर पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. पन्हाळावासीयांना पिण्यासाठी कासारी नदीतून ०.२७ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित आहे.
गावापेक्षा शहरात दरडोई दुप्पट पाणी नियोजनातील गोंधळामुळे टंचाई
By admin | Published: April 15, 2016 11:16 PM