कोल्हापूर : कोरोना संसर्गाबाबत कोल्हापूरकर जागरुक आहेत. त्यामुळे रविवारच्या ‘जनता कर्फ्यु’ला चांगला प्रतिसाद मिळाला. दिवसभर नागरिक घरात थांबल्याने ‘जनता कर्फ्यु’ यशस्वी झाला आहे. त्याबद्दल त्यांचे आभारी आहे. हे यश टिकविण्यासाठी त्यांनी रात्री नऊनंतरही बाहेर पडून गर्दी करु नये, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना केले. ३१ मार्चपर्यंत सार्वजनिक ठिकाणे व व्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेतला असून त्याला आज, सोमवारपासून जास्तीत जास्त नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संसर्गासंदर्भातील उपाययोजना व जनता कर्फ्युचा आढावा घेण्यासाठी सर्व विभागप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, प्रादेशिक परिवहन अधिकारी स्टीव्हन अल्वारीस, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे आदी उपस्थित होते.
बैठकीनंतर पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘जनता कर्फ्यु’ला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या निमित्ताने एक चांगला पायंडा पडला असून रात्री नऊनंतर बाहेर पडून नागरिकांनी त्यावर पाणी फिरवू नये. प्रशासनाने ३१ मार्चपर्यंत सार्वजनिक ठिकाणे व व्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला आज,सोमवारपासून जास्तीत जास्त लोकांनी प्रतिसाद द्यावा.
‘लॉक डाऊन’ करण्याचा निर्णय हा एका जिल्ह्यापुरता घेणे शक्य नाही. त्यामुळे यासंदर्भात राज्य शासनाकडून जर काही निर्णय घेतला गेला तर त्याची अंमलबजावणी केली जाईल. बॅँकांमधील आरटीजीएस व्यवहार, आॅनलाईन पेमेंट अशी अत्यावश्यक कामे आय.टी. च्या माध्यमातून होत आहेत. त्यामुळे आयटीपार्क सुुरु ठेवण्याबाबत सरकारकडून सुट देण्यात आली आहे. तसेच त्यांनीही वर्कफ्रॉम ही संकल्पना राबविली आहे.
५२३ जणांची वैद्यकिय तपासणी
पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘कोरोना’संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ५२३ लोकांनी वैद्यकिय तपासणी केली. त्यातील ४९५ लोक परदेशातून आले असून त्यांना होम कोरोंटाईन होण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. शनिवारपासून संस्थात्मक कोरोंटाईन सुरु करण्यात आले आहे. यातील एका हॉटेलमध्ये दोघेजण व शासकिय वसतीगृहात सहा जण राहात आहेत.
कोल्हापूरातील जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी आयोजित बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी जनता कर्फ्यु व कोरोना उपाययोजनेचा आढावा घेतला. यावेळी अभिनव देशमुख, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मल्लिनात कलशेट्टी, अमन मित्तल आदी उपस्थित होते.