लोकमत न्यूज नेटवर्कपन्हाळा : इतिहासाचा साक्षीदार व हिल स्टेशन म्हणून पन्हाळगडाची महती सर्वदूर आहे. येथील थंडगार वारा, निसर्गरम्य वातावरण, ऐतिहासिक गडकोट व किल्ले तसेच येथील प्रसिद्ध असलेले झुणका- भाकर यामुळे पन्हाळगडावर पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. मुलांची दिवाळीची सुटी व त्यातच शुक्रवारी पाडवा, शनिवार भाऊबीज व रविवार या सलग शासकीय सुट्यांमुळे पर्यटकांचे लोंढेच लोंढे पन्हाळ्यात पाहावयास मिळत आहेत. त्यामुळे पन्हाळगड पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाला आहे.कोल्हापूर शहरापासून अवघ्या वीस किमी अंतरावर असलेल्या तसेच सांगली, सातारा, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांनाही जवळ असणाºया व सर्वसामान्य लोकांच्या खिशाला परवडणाºया पन्हाळगडावर नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. सध्या दिवाळीच्या सुटीमुळे येथील तीनदरवाजा, अंधारबाव, सज्जाकोठी, धान्याचे कोठार, पुसाटीबुरुज परिसर, तबक उद्यान, लता मंगेशकर बंगला परिसर, आकाशवाणी टॉवर परिसर, पावनगड, रेडेघाट येथे पर्यटकांचे जत्थेच्या जत्थे पहावयास मिळत आहेत. पर्यटकांच्या गर्दीमुळे लहान-मोठे व्यवसाय तेजीत सुरू आहेत, तर हॉटेल्स व लॉजिंगचे येत्या महिनाभरासाठी बुकिंग असल्याचेही अनेक हॉटेलमालकांनी सांगितले. पर्यटकांच्या गर्दीमुळे पन्हाळा नगरपरिषदेच्या प्रवासी कर व वाहन कर यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गुरुवारी पन्नास हजार, शुक्रवारी पन्नास हजार, शनिवारी सत्तर हजार, रविवारी ९५ हजारच्या आसपास अशी एकूण अडीच लाख रुपयांची करवसुली झाल्याचे नगरपरिषदेच्या कर्मचाºयांनी सांगितले. भाजलेले व उकडलेले कणिस, पाणीपुरी, भेळ, रगडा, मिसळ, झुणका-भाकर या खाद्यपदार्थांवर ताव मारताना पर्यटक दिसत आहेत. या तीन दिवसांत गडावर सुमारे ५० हजार पर्यटकांनी विक्रमी हजेरी लावली.दरम्यान, पन्हाळा येथे पर्यटकांच्या गर्दीमुळे वाहतुकीचा व वाहन पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. येथील अंधारबाव परिसराचे पर्यटकांना नेहमीच आकर्षण असते. त्यामुळे या परिसरात बारा महिने गर्दीच असते.या परिसरातूनच पन्हाळ्याच्या पश्चिम भागाची व पावनगड, लता मंगेशकर बंगला परिसर येथील वाहतूक येथूनच सुरू असते. मात्र, सध्या वाहनांच्या व पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे या परिसरात वाहनांचे अस्ताव्यस्त पार्किंग व येथे पर्यटकांच्या मनोरंजनासाठी फनफेअरसारखे कोणत्याही प्रशासकीय विभागाची परवानगी न घेता बेकायदेशीररीत्या खेळणी, विशिष्ट प्रकारच्या गाड्या या अंधारबाव परिसराच्या रस्त्याच्या मधोमधच थाटल्याने वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली असून, येथे पायी चालणे देखील मुश्कील बनले आहे. पावनगड व सोमवार पेठ येथे येण्याजाण्यासाठी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे येथे खेळणी मालक व पर्यटकांच्यात वादाचे प्रसंगही उद्भवत आहेत.या गंभीर बाबींकडे नगरपरिषद, पोलीस व पुरातत्त्व विभागाने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. या विशिष्ट गाड्यांना परिवहन विभागाकडूनही परवाना नसून देखील यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने या बेकायदेशीर खेळणीधारकांचे आणि पोलिसांचे काही आर्थिक लागेबांधे असल्याची चर्चा सध्या स्थानिक नागरिकांबरोबर पर्यटकांतूनही सुरू आहे.
सलग सुट्यांमुळे पन्हाळ्यावर पर्यटकांचे लोंढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 1:01 AM