मलकापूर : घरकाम करताना महिलांना सतत चहा पिण्याची सवय असते. चहामुळे जरूर तत्कालिक प्रोत्साहन मिळते; परंतु त्यातून भुकेची भावना मारली जाते. त्यामुळे महिलांनो, चहाला नाही म्हणायला शिका, असे प्रतिपादन कोल्हापुरातील आहारतज्ज्ञ डॉ. शिल्पा जाधव यांनी बुधवारी येथे केले.‘लोकमत’ व मलकापूर नगरपरिषदेतर्फे आयोजित ‘महिलांचा आरोग्य व आहार’ या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. नगरपरिषदेच्या सभागृहात हे व्याख्यान झाले. त्यास महिलांनी गर्दी केली होती. यावेळी कर वसुलीत मलकापूर नगरपरिषदेने राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील व मुख्याधिकारी प्रमोद सव्वाखंडे यांचा ‘लोकमत’तर्फे मुख्य बातमीदार विश्वास पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मलकापुरात गेली पंचवीस वर्षे वृत्तपत्र विक्रीचे काम करणाऱ्या श्रीमती भारती विक्रम मोरे यांचाही यावेळी नगराध्यक्ष पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लोकमत सखी मंच सदस्या प्रिया मेंच, शुभलक्ष्मी देसाई, राधिका कुलकणी, स्वाती डोळस व मलकापूरचे बातमीदार राजू कांबळे यांनी संयोजन केले. तासभराच्या व्याख्यानात डॉ.जाधव यांनी महिलांना चांगल्या आरोग्याच्या टिप्स दिल्या. त्या म्हणाल्या,‘चांगला आहार व योग्य व्यायाम ही काही शिबिरात करण्यापुरतीच गोष्ट नाही. ती तुमची जीवनशैलीच बनली पाहिजे. आपण काय स्वरुपाचे काम करतो, त्यानुसार तुमचा आहार ठरतो. आपण हृदयाबद्दल जरा जागरूक झालो आहोत परंतु पोटाकडे मात्र सर्वांचेच दुर्लक्ष होते. कारण हृदय आपल्यावर अटॅक करते तर पोट नुसते काहीतरी सांगायचा प्रयत्न करते. त्याकडे आपण लक्ष न दिल्यास अनेक व्याधींना तेथूनच सुरुवात होते. चांगले कपडे घालणारे लोक पोट चांगले राहावे यासाठी फारसे काही करत नाहीत. सुंदर दिसण्याचा संबंध पोषण आहाराशी आहे. भूक लागली असताना न खाणे व ती लागली नसताना जास्त खाणे यासारखा दुसरा गुन्हा नाही. दिवसभर जे अन्न खाणार आहोत, त्यातील साठ टक्के अन्न सकाळी अकरापर्यंतच पोटात गेले पाहिजे व दुपारनंतर ते प्रमाण कमी व्हायला हवे; परंतु आपण रात्रीच भरपेट जेवतो, ज्यातून तुमचे आरोग्य बिघडते.’ व्याख्यानानंतर महिलांनी अनेक प्रश्न विचारून आरोग्यविषयक माहिती घेतली. प्रारंभी ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन झाले. शुभलक्ष्मी देसाई यांनी सूत्रसंचालन केले. विश्वास पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)मलकापूर येथे बुधवारी लोकमत व मलकापूर नगरपरिषदेतर्फे आयोजित कार्यक्रमात वृत्तपत्र विके्रत्या भारती मोरे यांचा नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ‘लोकमत’चे मुख्य बातमीदार विश्वास पाटील, मुख्याधिकारी प्रमोद सव्वाखंडे उपस्थित होते. दुसऱ्या छायाचित्रात व्याख्यान देताना डॉ. शिल्पा जाधव.
सततच्या चहामुळे मारली जाते भुकेची भावना
By admin | Published: April 15, 2016 1:18 AM