कोल्हापूर : शहर आणि उपनगरात डेंग्यू आणि भटक्या कुत्र्यांंच्या त्रासामुळे कोल्हापूरकर हैराण झाले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने युद्धपातळीवर विशेष पथक नेमून प्रबोधनाचे कार्य करावे, तसेच डेंग्यू आजार पसरविण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या घटकांना कडक सूचना द्याव्यात याबाबत शिवसेनेच्या शिष्ठमंडळाने सोमवारी महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.निवेदनात म्हटले आहे की, डेग्यू आणि भटक्या कुत्र्यांमुळे लोकांचे प्राण गेले आहेत. फक्त वर्तमानपत्रातून प्रबोधनाच्या जाहिराती न देता जे घटक कारणीभूत आहेत त्यांच्यावर कायदेशीररीत्या कडक कारवाई करावी. यासाठी विशेष पथक नेमून युद्धपातळीवर जनजागृती करणे आवश्यक आहे.
क्रिडाईच्या सदस्यांना बोलवून जिथे बांधकामे सुरू आहेत, तेथे पाणी न साचविण्याच्या योग्य त्या सूचना द्याव्यात. अन्यथा शिवसेना लढा उभा करेल, असा इशाराही देण्यात आला. शहरातील स्वच्छता मोहिमेबाबत आयुक्त डॉ. कलशेट्टी यांचा शिवसेनेच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी, डेंग्यूबाबत घरोघरी सर्वेक्षण सुरू आहे, याबाबत योग्य ती काळजी घेण्याचे काम सुरू आहे, असे सांगितले.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. या शिष्ठमंडळात, शहराध्यक्ष शिवाजीराव जाधव, सुजित चव्हाण, अवधूत साळोखे, दुर्गेश लिंग्रस, हर्षल सुर्वे, शरद पाटील, धनंजय सावंत, शशी बिडकर, दिलीप देसाई, रणजित आयरेकर, संजय जाधव, नरेश तुळशीकर, दिनेश परमार, धनंजय यादव, विराज ओतारी, शुभांगी पोवार, मेघना पेडणेकर, सुमन शिंदे, आदींचा सहभाग होता.रात्रीच्या मासांहारी भोजन वाहनांचे परवाने तपासाशहरात व उपनगर परिसरात रात्रीच्यावेळी मांसाहार भोजन विक्रीच्या गाड्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यांचे सर्वेक्षण करून त्याचे परवाने तपासावेत. या गाड्यावरील शिल्लक राहिलेल्या अन्नाची विल्हेवाट कशा पद्धतीने लावतात याची माहिती घ्यावी. भटक्या कुत्र्यांचे थवे अशा गाड्यामुळेच वाढत आहेत ते भविष्यात घातक ठरू शकतात, असा आरोप संजय पवार यांनी केला.