कोल्हापूर :छत्रपती शिवाजी स्टेडियमचा विकास लोकसहभागासह मैदानातून मिळणाऱ्या उत्पन्न स्त्रोतातून केला जाईल. त्या करीता आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. अशी माहीती शिवाजी स्टेडियम संकुल समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरूवारी दिली. शिवाजी स्टेडियम दुरावस्था प्रश्नी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात बोलाविलेल्या बैठकीत ते बोलत होते.जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, स्टेडियममधील गाळेधारकांना भाडेवाढीसंदर्भात नोटीस पाठविली जाईल. जे गाळेधारक भाडेवाढ देणार नाहीत.त्यांच्यावर कारवाई केली जाईल. जे भाडे जास्त देतील असे भाडेकरू ठेवले जातील. स्टेडियमच्या दर्शनी बाजूस एलईडी जाहीरात फलक लावून त्यातून उत्पन् मिळवले जाईल. याशिवाय मैदानाभोवती स्वतंत्र पे पार्किंग करून त्यातूनही उत्पन्न मिळवले जाईल. मैदान सांस्कृतिक कार्यक्रमाला भाड्याने देवून त्यातून उत्पन्न मिळू शकते. मात्र, हा पर्याय वापरताना सावध भूमिका घेवू.
यासर्व उत्पन्नाच्या स्त्रोतातून स्टेडियमचा विकास करू . यावेळी क्रीडा प्रेमींसोबत झालेल्या चर्चेत पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला. यात मैदानाजवळील अशोक पोवार, रामभाऊ कोळेकर यांनी आपल्या घराजवळील (आड)विहीरी सरकारने ताब्यात घ्याव्यात व त्यातून मैदानाला पाणी घ्यावे, असे आवाहन केले. तर क्रीडा शिक्षक आर.व्ही.शेडगे यांनी जयंती नाल्यातील अतिरिक्त पाणी मैदानासाठी वापरता येईल असेही सुचविले.जलतरण तलावाची दुर्दशेबाबतही क्रीडा प्रेमींनी प्रश्न उपस्थित केला. जलतरण तलावाची माहीती देताना जिल्हा क्रीडाअधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी ५० फ्लोटर घेतल्याच्या निदर्शनास आणले. तर तलावाच्या दुरूस्तीचा खर्च २२ लाख रूपये आहे. प्रत्यक्षात संकुल समितीकडे ९.५० लाखाचा निधी उपलब्ध आहे. मात्र, हा निधी अपुरा असल्याचे सांगितले. त्यावर जिल्हाधिकारी देसाई यांनी दुरूस्ती व देखभालसाठी सल्लागार समिती नेमु. त्यानूसार येणाऱ्या खर्चाची तरतुद करू.
विशेषत: जिल्हा नियोजनच्या नाविण्यपुर्ण योजनेतून हा निधी उपलब्ध करता येईल, असे सुचविले. यावेळी झालेल्या चर्चेतून जिल्हाधिकारी देसाई यांनी कोणाकडे निधी मागण्यापेक्षा मैदानातूनच उत्पन्न निर्माण करून त्याचा विकासासाठी वापर करू. अन्य कोणाकडे निधी मागायला नको. याबाबत झालेल्या चर्चेत माणिक मंडलिक, किशोर घाटगे, किसन कल्याणकर, जयकुमार शिंदे, रामेश्वर पतकी, सुहास साळोखे, संभाजीराव जगदाळे यांनी सहभाग घेतला.यावेळी सुरेश पाटील, बाबुराव घाटगे, डॉ. सुरेश फराकटे, दिग्विजय वाडेकर, चंचल देशपांडे, प्रकाश रेडेकर, सतीश पोवार, श्रीधर कुलकर्णी, महादेवराव जाधव, आदी क्रीडाप्रेमी उपस्थित होते. जिल्हाधिकारी देसाई यांच्या या भूमिकेचे क्रीडाप्रेमींनी कौतुक करून स्वागत केले.