भुर्इंज : दुष्काळाचे चटके आता भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनाही बसू लागले आहेत. पाससाठी पैसे नाहीत म्हणून कोण आत्महत्या करतंय तर कोणी शिक्षण सोडून जगण्याच्या लढाईसाठी परागंदा होत आहे. दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची स्वप्नं पूर्ण व्हावीत, यासाठी वाईच्या जनता शिक्षण संस्थेने ११ वी, १२ वीचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या तब्बल २५० विद्यार्थ्यांची शिक्षणासह सर्व व्यवस्था मोफत केली आहे. फक्त कपडे व आवश्यक प्रमाणपत्रांसह या आम्ही तुमचे भविष्य घडवू, असे आवाहन त्यांनी केले आहे.दुष्काळग्रस्त २५० विद्यार्थ्यांचा २ वर्षांसाठी संपूर्ण शैक्षणिक सुविधेसह मोफत सांभाळ करण्याची योजना वाईच्या जनता शिक्षण संस्थेने सुरु केली आहे. ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांनी प्रत्यक्ष कार्यवाहीलाही प्रारंभ केला आहे. या योजनेसाठी सुमारे चार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी विदर्भ, मराठवाडा आणि धुळे ते कवठे महांकाळसह दुष्काळाने उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांची निवासाची सोय करण्यासाठी २ कोटी रुपये खर्चाचे वसतिगृह २ महिन्यात उभारण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ पाडव्याच्या मुहूर्तावर पार पडला. फक्त कपडे व आवश्यक प्रमाणपत्रांसह विद्यार्थ्यांनी वाईच्या किसन वीर महाविद्यालयात २ वर्षांसाठी यावे, त्यांना औषधे, कपडे, भोजन, निवास, पुस्तके, शालेय साहित्य आणि व्यक्तिमत्व विकासासाठी सर्व सोयी मोफत पुरविण्यासाठी आणखी २ वर्षांत एकूण ४ कोटींचा खर्च जमा करणार आहे, असे प्रतापराव भोसले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनहीया विद्यार्थ्यांना जलदगतीने स्वत:च्या पायावर उभा राहता यावे, यासाठी विविध भरतीसाठी प्रशिक्षण व स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शनाची सोय उपलब्ध करुन दिली जाणार आहे. पोलिस भरती, सैन्य भरतीच्या प्रशिक्षणासाठी दोन अधिकारी नेमले जाणार आहेत. अनुभवी व कर्तव्यदक्ष प्राध्यापक वर्ग आणि सुसज्ज ग्रंथालय विद्यार्थ्यांची ज्ञानाची आणि त्यांच्या पोटाची भूक भागविण्यासाठी संस्था समर्थ आहे. या उपक्रमासाठी मदत करणाऱ्यांची वाणवा भासणार नाही, असाही विश्वास भोसले यांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी ‘वाई’चा हात!
By admin | Published: April 13, 2016 10:57 PM