अर्जुन कर्पे ।लोकमत न्यूज नेटवर्ककवठेमहांकाळ : गतवर्षी अत्यल्प झालेले पर्जन्यमान, चालूवर्षी ४३ अंशावर गेलेले तापमान, आटलेले पाण्याचे स्रोत, अपूर्ण असलेल्या सिंचन योजना यामुळे कवठेमहांकाळ तालुका उन्हाच्या आगीत आणि दुष्काळाच्या वणव्यात होरपळत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी घाटमाथा व ढालगाव परिसर टाहो फोडत आहे.कवठेमहांकाळ तालुक्यात घाटमाथा व ढालगाव परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक अक्षरश: वण वण भटकत आहेत. तालुक्यात या परिसरातील १९ गावांना व १०९ वाड्या-वस्त्यांवर टँकर सुरू असून, या सुरू असणाऱ्या खेपाही अपुºया पडत आहेत. वाढीव खेपांची मागणी होऊ लागली आहे. ३० हजारांवर लोकसंख्या पाण्याच्या टँकरवर तहान भागवत आहे.तालुक्यात विहिरी, कूपनलिका, तलाव हे पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत आहेत. परंतु विहिरींनी तळ गाठला आहे. कूपनलिकांची पाण्याची पातळी घटली आहे. सिंचन योजनांचे पाणी मृगजळ आहे. त्यामध्ये नियमित पणा नाही. टेंभू व म्हैसाळ योजनेची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे पाणी सोडण्यातही अडचणी आहेत.सध्या तालुक्यात १९ गावांना व १०९ वाड्या-वस्त्यांना १३ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. त्यामध्ये सध्या केरेवाडी, जाखापूर, रांजणी, घाटनांद्रे, कुंडलापूर, गर्जेवाडी, वाघोली, घोरपडी, रायवाडी, चोरोची, लोणारवाडी, अलकूड एस, ढालगाव, कोकळे, इरळी, चुडेखिंडी, शिंदेवाडी (घो) या गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र रांजणी, केरेवाडी, अलकूड एस या गावांनी आणखी जादा टँकरची प्रशासनाकडे मागणी केली आहे.तालुक्यात दरवर्षीच पाणीटंचाई असते. परंतु यावर्षी नेहमीपेक्षा पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. टँकरने देण्यात येणारे पिण्याचे पाणी फक्त नागरिकांना दिले जाते. परंतु नागरिकांना या वाटणीला आलेल्या पाण्यातून स्वत:ची व जनावरांचीही तहान भागवावी लागत असल्याने, वाटण्यात येणारे टॅँकरचे पाणी पुरेसे होत नाही. त्यामुळे यावर्षी अधिकच पाणी मागणी वाढली आहे.तालुक्यात ११ तलावांपैकी ४ तलाव कोरडे पडले असून, ४ तलाव सीलखाली आहेत. २६ एप्रिलपर्यंतची ही तलावांची स्थिती आहे. तालुक्यातील टंचाईची परिस्थिती कायमची हटवायची असेल, तर म्हैसाळ व टेंभू योजना कायमस्वरूपी व नियमित सुरू ठेवल्या पाहिजेत. पावसाचे पाणी अडवून ते जिरवले पाहिजे व भूजल पातळी वाढविण्यास मदत केली पाहिजे. तालुक्यातील भूजल पातळी ही गेल्या पाच वर्षांत ६.५७ अशी होती, आता त्यामध्ये घट झाली आहे. ती ७.८० इतकी झाली आहे. त्यामुळे पाण्याचे असणारे स्रोत आटले आहेत.
दुष्काळाच्या वणव्यामध्ये होरपळतोय कवठेमहांकाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 10:52 PM