कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील संशयित समीर विष्णू गायकवाड (वय ३२, रा. दक्षिण शिवाजीनगर, मोती चौक, शनी मंदिराजवळ, शंभर फुटी रोड, सांगली) याला कोल्हापूर पोलिसांनी प्रथम वर्ग न्यायाधीश (क्रमांक ६) आर. डी. डांगे यांच्यासमोर हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. संशयिताचा या हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याचे भक्कम पुरावे प्राप्त झाल्यानंतरच त्याला अटक केल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी न्यायालयात सुनावणी दरम्यान सांगितले. या घटनेची कोणाला चाहूल लागू नये, यासाठी न्यायालय परिसरात साध्या वेशात सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी प्रसारमाध्यमांचा गराडा चुकवून संशयिताला पोलिसांनी चक्क पळवत जीपमध्ये बसवून नेले. न्यायालय परिसरातील ही पळापळ पाहून नागरिक, शासकीय कर्मचारी व पक्षकार बिथरून गेले. संशयित गायकवाड याला स्थानिक गुन्हे अन्वेषण व राजारामपुरी पोलिसांनी बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास कसबा बावडा येथील न्यायालयात हजर केले. न्यायाधीश डांगे यांच्यासमोर आरोपीला हजर केले. यावेळी साहाय्यक सरकारी वकील विशाखा सुरेंद्र भरते यांनी बाजू मांडली. त्या म्हणाल्या, ‘गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ ला प्रतिभानगर येथे गोळीबार झाला होता. त्यामध्ये गोंविद पानसरे यांचा मृत्यू झाला. संशयित आरोपीने हत्येचा कट रचण्यासाठी काय तयारी केली होती. या कटाचे धागेदोरे राज्यभर व आंतरराज्यीय पसरले आहेत. त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का. गुन्ह्यांत वापरलेले पिस्तूल कुठून आणले, गोळ््या कोठून आणल्या, हत्येनंतर त्याची त्याने काय विल्हेवाट लावली, यामध्ये त्यास आणखी कुणी मदत केली याची माहिती मिळविण्यासाठी आरोपीला १४ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी. न्यायाधीश डांगे यांनी पोलिसांना तुम्ही कोणत्या आधारावर संशयिताला अटक केली, असा प्रश्न विचारला. त्यावर पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांनी गेले सहा महिने २२ पथके या हत्येप्रकरणी तपास करीत आहेत. सुरुवातीपासून संशयिताच्या हालचालींवर वॉच ठेवला होता. त्याचे मोबाईल कॉल डिटेक्शन, मुंबई, कोल्हापूर दौरा अशी संपूर्ण माहिती घेतली. त्याच्याकडे चौकशी करून त्याने दिलेल्या माहितीची खातरजमा केली असता त्यामध्ये विसंगती आढळली. त्याचा या हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याचे भक्कम पुरावे प्राप्त झाल्यानंतरच त्याला अटक केली आहे. या हत्येमागचा मुख्य सूत्रधार व साथीदार कोण आहेत. त्याने हत्येचा कट कधी रचला, पिस्तूल व गोळ्या कुठून आणल्या. गुन्ह्यांत वापरलेली मोटारसायकल कुठे टाकली, यासह अन्य काही गोष्टींचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी मिळावी, अशी विनंती केली. त्यानंतर न्या. डांगे यांनी संशयित गायकवाडला ‘तुझं म्हणणं काय आहे,’ अशी विचारणा केली. त्याने हल्ला झाला त्यादरम्यान मी दीड-दोन महिने कोल्हापुरात नव्हतो. त्यामुळे माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नसताना पोलिसांनी मला अटक केली असल्याचे सांगितले. सरकारी वकील, पोलीस व संशयित आरोपीचे म्हणणे ऐकून न्या. डांगे यांनी आरोपी गायकवाड याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, पोलिसांनी छायाचित्रकारांचा गराडा पाहून संशयित गायकवाड याला बुरखा घालून दुसऱ्या मार्गाने पळवत पोलीस जीपमध्ये बसविले. त्यानंतर जीप अलंकार हॉलच्या दिशेने रवाना झाली. (प्रतिनिधी)
सहभागाचे पुरावे असल्यानेच अटक
By admin | Published: September 17, 2015 1:28 AM