कोल्हापूर : पोलीस अधीक्षकांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून शुक्रवारी शाहूपुरीतील एका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांनी डॉल्बीविरोधात पोलीस नियंत्रण कक्षाकडे तक्रार केली, परंतु पोलिसांनी डॉल्बीवर कारवाईचे सोडाच, ज्यांनी तक्रार केली त्यांचीच उलटतपासणी केल्याचा अनुभव आला. त्यांनी त्याबद्दल ‘लोकमत’ हेल्पलाईनकडे तक्रार केली.गेल्या २२ जुलैला पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी स्वत:हून वृत्तपत्रांत निवेदन प्रसिद्धीस दिले व डॉल्बीविरोधात तक्रारींसाठी लोकांनी पुढे यावे, असे आवाहन केले. त्यासाठी त्यांनी नियंत्रण कक्षाकडे (१०० नंबर)वर त्याबद्दल तक्रार करावी, असे आवाहन केले. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असेही त्यांनी म्हटले होते. त्यानंतर लगेचच चार दिवसांत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा यांनीही कोल्हापूरसह पाच जिल्ह्यात ‘डॉल्बी बंद’ करणार असल्याचे जाहीर केले. त्र्यंबोली यात्रेमध्येही डॉल्बी लावण्यास सक्त मनाई करण्यात आली असल्याचे वर्मा यांनीही स्पष्ट केले होते परंतु या दोन्ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर बसवून शुक्रवारी शाहूपुरीत डॉल्बीचा दणदणाट सुरू राहिला. त्याबद्दल एका ज्येष्ठ नागरिकांनी नियंत्रण कक्षाकडे तक्रार केल्यावर त्यांनी तक्रारदाराचे नाव सांगण्याचा आग्रह धरला. तक्रार नोंदवून घेतल्यावर पुन्हा पोलिसांतून फोन आला व तुम्हीच चौकशी केली होती काय, म्हणून दरडावणीच्या सुरात विचारणा करण्यात आली. त्यांनीही नाव, पत्ता विचारून घेतला. संबंधित तक्रारदार व्यक्तीने नाव, पत्ता सांगून आपण काय स्वरूपाचे सामाजिक काम करतो हे सांगितल्यावर पोलिसाने ‘बरं...बरं...’ म्हणून फोन बंद केला परंतु त्यानंतरही डॉल्बीचा दणदणाट सुरुच राहिला. पोलिसांना जर कारवाई करण्याची भीती वाटते तर त्यांनी मग लोकांना तक्रारीसाठी आवाहन तरी करू नये, अशी उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली.
कारवाईची भीती वाटते तर डॉल्बी बंदचे आवाहन का?
By admin | Published: August 08, 2015 12:30 AM