कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत ‘गोकुळ’च्या कारभाऱ्यांना चांगलाच दणका बसल्याने ते खडबडून जागे झाले आहेत. सर्वसामान्यांचा संघ स्वत:च्या घशात घालू पाहणाºयांना जनतेने जागा दाखवली असून, त्यामुळेच विधानसभा निवडणुकीच्या भीतीपोटीच संचालक व कारभाºयांनी गाड्या बंद करण्याचा निर्णय घेतल्याची टीका ‘गोकुळ’ बचाव कृती समितीच्या पत्रकातून केली आहे.
आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील ‘गोकुळ बचाव कृती समिती’ने मल्टिस्टेटला विरोध केला. त्याचबरोबर संघातील भ्रष्टाचार, गाय दूध खरेदी दरात केलेली कपात, पशुखाद्याच्या दरात केलेली वाढ, ‘गोकुळ’ शॉपीतील भ्रष्टाचार, नोकरभरती या विरोधात संघर्ष सुरू केला आहे. संघात संचालकांच्या गाड्यांवर मोठ्या प्रमाणात उधळपट्टी सुरू होती, या विरोधात आकडेवारीसह कृती समितीने आक्षेप घेतले होते. लोकसभा निवडणुकीत मल्टिस्टेटसह एकूणच कारभाराचे पडसाद उमटले आणि जनतेने कारभाºयांना जागा दाखविली. विधानसभा निवडणुकीतही त्याचे परिणाम होणार, या भीतीपोटी संचालकांच्या गाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला. संचालकांच्या गाड्या बंद केल्या म्हणजे संघातील भ्रष्टाचार संपला असे नाही. अजून अनेक गोष्टीत उधळपट्टी सुरू असून, त्याला पायबंद लावल्याशिवाय कृती समिती स्वस्थ बसणार नाही.
सत्ताधाºयांचा कारभार पाहता, दूध उत्पादकांच्या हिताचा विचार न करता अधिक मलई कशी मिळेल, याचा विचार या मंडळींनी आजपर्यंत केला. या प्रवृत्तीला प्रत्येक ठिकाणी विरोध करण्याचे काम आमदार सतेज पाटील यांनी केल्याचे कृती समितीचे बाबासाहेब देवकर, बाळासाहेब कुपेकर, किशोर पाटील, सदाशिव चरापले, बाबासो चौगले, किरणसिंह पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.