संतोष भोसले
किणी : महापुरामुळे नदीकाठावरील शेतीला पाणीपुरवठा करणारे विद्युत मोटारपंप, तराफे वाहून गेले आहेत तर, ट्रान्सफर, विजेचे पोल मोडून पडले असल्याने शेतीला पाणीपुरवठा करणारी यंत्रणाच कोलमडून गेली असल्याने महापुरामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने २०१९ महापुरात झालेल्या नुकसानीची पंचनामे करूनसुद्धा कोणत्याही नुकसानभरपाई मिळाली नसल्याने स्वखर्चाने दुरुस्ती करावी लागेल. यावर्षी तरी शासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱी व पाणीपुरवठा संस्थाकडून करण्यात येत आहे.
नदीकाठावर शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी बसविलेल्या शेतकऱ्यांच्या वैयक्तिक मालकीचे व सहकारी पाणीपुरवठा संस्थाचे विद्युत मोटारपंप , तराफे वाहून गेले तर मोटारपंपाला विद्युत पुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मर,पोल अक्षरशः मोडून पडले आहेत तर स्टाट्रर, ॲटोस्वीचसह विविध प्रकारचे उपकरणे पाण्यामुळे खराब झालू असल्याने पिकाच्या बरोबर शेतीला पाणीपुरवठा करणारी यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सहकारी पाणीपुरवठा संस्था व खासगी पंपधारक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
जिल्ह्यात उच्चदाब विजेच्या शंभर सहकारी पाणीपुरवठा संस्था असून त्याचे सभासद अल्पभूधारक शेतकरी आहेत. या उच्चदाब सहकारी पाणीपुरवठा संस्थांना विद्युत पुरवठा करणारे ट्रान्सफाॅर्मरसह, विद्युत तारा व पोल याची दुरूस्ती स्वखर्चाने करावी लागते याचा खर्च मोठ्या प्रमाणात येते असल्याने याचा आर्थिक बोजा साहजिकच अल्पभूधारक शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे. शेती सावरण्यासाठी शासनाने याचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी व पाणी संस्थांच्यावतीने करण्यात येत आहे.
...........
त्वरित पंचनामे करा
महापुरामुळे शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या सिंचन योजनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून २०१९ महापुरातील नुकसानीची पंचनामे करून १३ कोटी ८४ लाख रुपयांची नुकसानीची रक्कम निश्चित केले होती. मात्र, शासनाकडून नुकसानभरपाई दिली नाही. यावर्षी महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेती सावरण्यासाठी पंचनामे करून शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील(किणीकर)यांनी केले आहे.