संतोष बामणे -- जयसिंगपूर --शिरोळ तालुक्यातील ऊस गळीत हंगाम संपल्यामुळे ओल्या वैरणीचे संकट ओढावले आहे़ शेतातील वैरणीसाठी लागण केलेली पिके पाणी नसल्यामुळे संकटात आली आहेत़ त्यामुळे शेतकरी उभ्या पिकांवर विळा लावून आपली जनावरे जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत़ सध्या बाजारात ओल्या चाऱ्याचा दर कडाडलेला असून, वाळलेल्या वैरणीची मोठी टंचाई निर्माण झाली आहे़ तर कडाडले पशुखाद्य त्यामुळे शिरोळ तालुक्यातील हजारो शेतकरी मेटाकुटीला आहेत़ शिरोळ तालुक्यातील कृष्णा, वारणा, पंचगंगा, दुधगंगा या चार नदीकाठांवरील शेतकऱ्यांनी जनावरे जगविण्यासाठी गवत, हत्ती गवत व वैरणीची लागवड केली आहे़ मात्र, धरण क्षेत्रातील पाणी कमी असल्यामुळे सध्या उपसाबंदी लागू झाली आहे़ त्यामुळे माणसाच्या पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्याही वैरणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ सध्या शेतीच्या मशागतीला मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात तणनाशकांचा वापर करीत असल्यामुळे शेतामध्ये येणारे तण अनेक प्रजातीचे गवत कायमच नष्ट होत चालले आहे़ त्यामुळे जनावरांना सकस चाऱ्यापासून वंचित राहावे लागत आहे़ तर दुष्काळामुळे चाऱ्याचे भाव गगनाला भिडल्यामुळे पशुपालनही धोक्यात आले आहे़ शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय आघाडीवर आहे़ मात्र, हा दूध व्यवसाय दुष्काळामुळे संकटात सापडला आहे़ शिरोळ तालुक्यातील निमशिरगांव, तमदलगे, जैनापूर, चिपरी, कोंडिग्रे, आदी गावांत पाणी संकट ओढावल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी आपली जनावरे चाऱ्याअभावी विकली आहेत़ सध्या आहेत ती जनावरे जगविण्यासाठी वाळलेले गवत, कडब्याची आवक पंढरपूर भागातून करीत आहेत़ मात्र, याचाही दर न परवडणारा आहे़, अशा विविध संकटांमुळे दूध उत्पादकांना फटका बसत आहे़
चारा टंचाईमुळे उभ्या पिकांवर विळा
By admin | Published: April 26, 2016 9:00 PM