कोल्हापूर : ढगफुटीसदृश पडणाऱ्या पावसाने जिल्हाभर हाहाकार केला असून सर्वच नद्यांना पूर आला आहे. पंचगंगा नदीने गुरुवारी दुपारी दोन वाजता इशारा पातळी ओलांडत धोका पातळीच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू केली. १०७ बंधारे पाण्याखाली गेले असू्न ८ राज्य मार्ग आणि २५ जिल्हा मार्ग असे एकूण ३३ मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाले आहेत. महापुराची परिस्थिती गंभीर होण्यापूर्वीच एनडीआरएफची दोन पथके संध्याकाळी दाखल झाली. दरम्यान, संभाव्य धोका पाहता नदीकाठच्या गावातील नागरिकांचे स्थलांतर सुरू झाले आहे. बर्की (ता. शाहूवाडी) गावाचा संपर्क तुटला असून संध्याकाळपर्यंत संपर्क तुटलेल्या गावांची संख्या आणखी वाढणार आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा झाल्याचे निमित्त होऊन जिल्ह्यात मंगळवारपासून धुवाधार पाऊस कोसळत आहे. बुधवारपासून सुरू झालेला पावसाचा धिंगाणा गुरुवारीही कायम होता. गुरुवारी मध्यरात्रीपासून ते गुरुवारी दिवसभर पावसाने अक्षरश: थैमान घातले. धरणांच्या पाणलोट क्षेत्रासह डोंगराळ तालुक्यात तर ढगफुटीसदृश अवघ्या काही तासांतच विक्रमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे नदी-नाले भरून वाहू लागल्याने जिल्ह्यातील दळणवळण पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
घाट मार्ग बंद
पावसामुळे ३३ प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाले आहेत. यात कोल्हापूर ते रत्नागिरी, गगनबावडा, चंदगड, गारगोटी, कागल-मुरगूड, उत्तूर ते गडहिंग्लज, चंदगड या प्रमुख मार्गांचा समावेश आहे. भुईबावडा, करुळ घाटात दरड कोसळल्याने कोकणात जाणारी वाहतूक आंबोली व फोंडा घाटामार्गे वळवण्यात आली आहे, पण तेथे अनेक लहान-मोठ्या ओढ्यांवर पाणी आल्याने राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. आंबा घाटात रस्ता खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.
पाऊस रविवारपर्यंत
पाऊस रविवारपर्यंत असाच कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पूर आणि दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
राधानगरी धरण ७५ टक्के भरले
राधानगरी धरण ७५ टक्के भरले आहे. ९७ टक्के भरल्याशिवाय धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडत नाहीत. त्यामुळे सध्या फक्त सांडव्यावरून १४२५ क्युसेक पाण्याचा भोगावती नदीपात्रात विसर्ग सुरू असल्यामुळे पाणीपातळीत वाढ होत आहे. बुधवारी धरणातील पाणीसाठा ५९ टक्के होता. तो गुरुवारी सायंकाळपर्यंत तब्बल ७५ टक्क्यावर पाेहोचला. २४ तासांत तब्बल १६ टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
अलमट्टीतून ९७ हजार क्युसेक विसर्ग
पाऊस वाढल्याने अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. सद्य:स्थितीत प्रति सेकंद ९७ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कोल्हापूर, सांगलीतील पंचगंगा, कृष्णेचे पाणी वेगाने पुढे सरकत आहे.
दर तासाला ५ ते ६ इंचाने पाणीपातळीत वाढ
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत तर तासाला ५ ते ६ इंचाने वाढ झाली. राजाराम बंधाऱ्याजवळ दिवसभरात ८ फुटाने पाणीपातळी वाढली.
अशी वाढली पाणीपातळी
सकाळी ७ : ३५.०७
सकाळी ८ : ३५.११
दुपारी १२ : ३७.११
दुपारी १ : ३८. ००
दुपारी २ : ३९.००
दुपारी ३ : ३९.०२
दुपारी ४ : ३९.०६
संध्याकाळी ५ : ४०.००
चंदगड, आजरा, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावड्यात १५० ते २०० मि.मी. पाऊस अवघ्या १२ तासांत पडला आहे. त्याचवेळी कागल, करवीर, हातकणंगले, शिरोळमध्ये ८० ते १२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
प्रमुख धरणातून विसर्ग क्युसेकमध्ये
राधानगरी - १४२५
तुळशी ००
वारणा - ११२५
कासारी - ५५००
कुंभी - ७८०
दूधगंगा - ००
पाटगाव- २२०
अलमट्टी ९७०००
हिप्परगी ७४०००
१०७ बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदी : शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ.
भोगावती नदी : राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे, तारळे व शिरगाव.
तुळशी नदी : बीड, आरे, बाचणी, घुंगुरवाडी, कांचनवाडी, चांदे व भाटणवाडी.
कासारी नदी : यवलूज, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपण, बाजारभोगाव, पेंडाखळे, कांटे, करंजफेण व वालोली.
कुंभी नदी : शेनवडे, कळे, वेतवडे, आसळज, मांडुकली व सांगशी.
धामणी नदी : पनोरे, गवसी, म्हासुर्ली, सुळे व आंबर्डे,
वारणा नदी : चिंचोली, माणगाव, कोडोली, शिगांव, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, चावरे, खोची व दानोळी.
कडवी नदी : वाळूर, भोसलेवाडी, येलूर, कोपार्डे, शिगांव, सवते सावर्डे व सरुड पाटणे.
दूधगंगा नदी : सिद्धनेर्ली, सुळकूड, बाचणी, दत्तवाड, सुळंबी, तुरंबे व कसबा वाळवे.
वेदगंगा नदी : निळपण, वाघापूर, गारगोटी, म्हसवे, कुरणी, बस्तवडे, सुरुपली, चिखली, करडवाडी, शेणगाव, शेळोली, कडगाव, सुक्याची वाडी, तांबाळे, अनप व दासेवाडी.
हिरण्यकेशी नदी : साळगाव, ऐणापूर, निलजी, गिजवणे, खाणदळ, चांदेवाडी, देवर्डे, दाभीळ, हजगोळी, जरळी, हरळी व भादवण.
घटप्रभा नदी : कानडे सावर्डे, पिळणी, बिजूर भोगाली, हिंडगाव, तारेवाडी, अडकूर व कानडेवाडी,
ताम्रपर्णी नदी : कोवाड, चंदगड, कुर्तनवाडी व हल्लारवाडी,
चित्री नदी : कारपेवाडी, चिकोत्रा नदीवरील- कासारी, वडगांव, अर्जुनवाडा, मेतके व गलगले
धरणातील पाणीसाठा (दशलक्ष घनमीटरमध्ये )
राधानगगरी १७४.८३
तुळशी ६७.२१
वारणा ८३८.५२
दूधगंगा ४३०.३३
कासारी ६१.७१
कडवी ५९.५९
कुंभी ६३.९५
पाटगाव ८१.४२
चिकोत्रा २७.६०
चित्री ४१.४७
जंगमहट्टी १८.०४
घटप्रभा ४४.१७
जांबरे २३.२३
आंबेआहोळ २१.८४