कोल्हापूर : कडाक्याच्या उन्हामुळे नागरिकांच्या घशाला कोरड पडू लागली आहे. त्यामुळे तहान भागविण्यासाठी नागरिकांचा ओढा शीतपेये व बर्फखरेदीकडे वाढला आहे. विशेषत: शीतपेये थंड राहण्यासाठी व सरबतांकरिता सुमारे दहा टन बर्फ, तर सुमारे ५७ कोटी लिटर शीतपेये जिल्ह्यात खपत आहेत.नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता, अन्न व औषध प्रशासनाच्या मानांकनानुसार मिनरल वॉटरमधील बर्फ तयार करण्याच्या सूचना उत्पादकांना गेल्या वर्षीपासून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शहरातील बर्फ उत्पादकांकडून मिनरल वॉटरमधील बर्फ तयार केला जात आहे.
वाढत्या उन्हाचा तडाखा सुसह्य करण्यासाठी व तहान भागविण्यासाठी नागरिक कोल्हापुरात थंडगार उसाच्या रसाचा आधार घेत आहेत. (छाया : दीपक जाधव)
या खाण्यायोग्य बर्फाचा दर ३० किलोेंच्या लादीला ५५० रुपये आहे. कोल्हापूरकरांकरिता दिवसाला सरासरी दीड टन बर्फ नियमित वापराकरिता लागत आहे. जसजसा उन्हाचा तडाखा वाढू लागतो तशी बर्फाची मागणी वाढते. त्यामुळे दिवसाकाठी जिल्ह्यात सुमारे १० टन बर्फ लागत आहे. विशेषत: गारेगार, मेवाड आइस्क्रीम, सोलकढी, ताक, सरबत विक्रेते, लग्नसमारंभ, विविध कार्यक्रमांच्या जेवणावळीकरिता बर्फाची गरज लागत आहे. त्यामुळे बर्फाच्या खपात दिवसेंदिवस वाढ होत आहे.
दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढू लागला तशी बर्फालाही मागणी वाढू लागली आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ)वाढत्या उन्हाच्या तडाख्यात तहान भागविण्यासाठी नागरिकांकडून विविध कंपन्यांची शीतपेये रिचविली जात आहेत. त्यामुळे विविध कंपन्यांच्या १२५० मि.लि., ६०० मि.लि., २५० मि.लि. बाटल्यांना मागणी वाढली आहे. विशेषत: कृत्रिम पेयांपेक्षा आंबा, लिंबूवर्गीय शीतपेयांना अधिक मागणी आहे.
जसा उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे तशी या कंपन्यांच्या शीतपेयांचीही मागणी वाढू लागली आहे. जिल्ह्यात अशा कंपन्यांची सुमारे ५७ कोटी लिटर शीतपेये खपत आहेत. त्यामुळे नागरिकांकडून उन्हाळा सुसह्य करण्यासाठी तयार शीतपेयांसह सरबत, कोकम, ताक, उसाचा रस, कलिंगडे, आदींची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. ही शीतपेये पिण्यासाठी जागोजागी दुपारी गर्दी होत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढल्याने पाराही चढू लागला आहे. गुरुवारी ३९ अंश सेल्सिअस, तर आज, शुक्रवारी तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. गुरुवारी रात्री किमान तपमान २९ अंश सेल्सिअस होते; तर गुरुवारी दिवसभर हवेत उष्मा अधिक असल्याने शहरवासीयांना जणू उष्णतेच्या लाटेचा अनुभव आला.
उन्हाचा तडाखा वाढेल तशी बर्फाला मागणी वाढते. त्यामुळे दिवसाकाठी दीड टन बर्फ शहरात लागतो. उन्हामुळे मागणी पाच टनांच्या पुढे जात आहे. विशेषत: मिनरल वॉटरमधील बर्फाला मागणी अधिक आहे.- धवल भोसले-पाटील, बर्फ उत्पादक
उन्हाचा तडाखा वाढेल तसे विविध कंपन्यांच्या शीतपेयांची मागणी वाढते. विशेषत: अंबा, लिंबूवर्गीय शीतपेयांना अधिक मागणी आहे. जिल्हाभरात सुमारे कोट्यवधी लिटर शीतपेये विकली जातात.- जमीर शेख, विक्री प्रतिनिधी, घाऊक शीतपेय डीलर