इचलकरंजी - केंद्र सरकारने यंदा एफआरपी वाढवली आहे. त्यामुळे साखरेचा सरासरी उतारा पाहता कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा किमान साला प्रति टन 3400 रुपयांचा पहिला हप्ता निश्चितपणे मिळणार आहे. त्यामुळे ऊस दरासाठी आंदोलन करण्याची गरजच उरली नाही, असे प्रतिपादन राज्याचे कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. नारायणराव घोरपडे नाट्यगृह चौकात आयोजित रयत क्रांती संघटनेच्या पहिल्या शेतकरी मेळाव्यात मंत्री खोत बोलत होते. यावेळी सिनेअभिनेता राहुल सोलापूरकर यांची खास उपस्थिती होती. खोत पुढे म्हणाले रयत क्रांती संघटना कोणाची संघटना मोडण्यासाठी नसून ती शेतकर्यांचा संसार उभारण्यासाठी आहे. तसेच माझ्या जाण्याने स्वाभिमानीचा टवकाही उडला नाही म्हणणार्यांना खिंडार पडल्याचा टोलाही यावेळी खोत यांनी लगावला. वेगवेगळे आरोप करुन माझ्यामुळेच शेतकर्यांचा प्रश्न निर्माण झाल्याची टीका होत आहे. पण 32 वर्षे घरावर तुळशीपत्र ठेवून फक्त शेतकर्यांसाठी लढलो असून त्यासाठी कोणी निष्ठेचे सर्टीफिकेट देण्याची गरज नाही. जनतेने राजीनामा मगितल्यास हजारवेळा राजीनामा देईन, पण मी गड सोडून पळणारा नव्हे तर लढणारा कार्यकर्ता आहे. माझा राजीनामा मागण्याचा हक्क केवळ शेतकर्याला असून कोणीतरी सांगतो म्हणून मी राजीनामा देणार नाही.
देशात सरासरी 235 ते 245 लाख मेट्रीक टन साखरेचे उत्पादन होणार आहे. मात्र गरज 250 ते 260 लाख मेट्रीक टन इतकी आहे. गरजेपेक्षा कमी उत्पादन होणार असल्याने सखरेचे दर स्थिर रहाणार आहेत. शिवाय एफआरपीनुसार 9.5 टक्के साखर उतार्यासाठी 2550 रुपये, 12 टक्क्याला 3220 आणि 13 टक्क्याला 3486 रुपये प्रति टन असा कायद्यानुसार दर कारखानदारांना द्यावाच लागणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात सरासरी 12.50 टक्के साखर उतार्यामुळे 3400 रुपयांचा पहिला हप्ता निश्चित मिळणार आहे. तरीही एफआरपी आणि अधिक 300 रुपये अधिक असा दर कारखांदारांनी द्यावा असे आवाहन ही त्यांनी केले. तसेच साखरेचा भाव वाढला तर रंगराजन शिफारशीनुसार 70:30 हा फॉर्म्युला वापरायचा असेही त्यांनी स्पष्ट केले. मी सत्तेत असलो तरी शेतकर्यांचे प्रश्न सरकार ऐकत नसेल तर आंदोलनासाठी बलिदानाची तयारी ठेवा, असे आवाहन खोत यांनी केले. स्वागत मोहन माने यांनी तर प्रास्ताविक इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी केले. याप्रसंगी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, अशोक स्वामी, सागर खोत, सतिश वुरूलकर, संघटनेचे युवाध्यक्ष शार्दुल जाधवर आदींची भाषणे झाली. मेळाव्यास महाराष्ट्र, कोकण, खानदेश, कर्नाटक आदी भागातून शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.
शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणारसरसकट कर्जमाफीचा लाभ 50 लाख शेतकर्यांना मिळणार असून त्यांची दिवाळी गोड होणार आहे. तसेच 2018 पर्यन्त नियमित कर्जाची परतफेड करणार्यांनाही कर्जमाफी मिळणार आहे.
पवार शेट्टी एक गट्टीबारामतीत जाऊन ज्या पवारांना नावे ठेऊन तुम्ही खासदार झालात आता त्यांचे गुणगान तुम्ही गात गळ्यात गळे घालून फिरत आहात, असा आरोप खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता केला.
प्रत्येक जिल्ह्यात वेगळीच गट्टीआम्हाला एकनिष्ठ नाही म्हणणाऱ्यांनी प्रत्येक जिल्ह्यात वेग-वेगळ्या पक्षाबरोबर युती केली आहे. सत्तेसाठी सगळे चालतात मग सदाभाऊ का नाही चालला,असा सवाली खोत यांनी केला.