कोल्हापूर : वर्षभरात किती गुन्हे दाखल झाले, किती उघडकीस आले, पोलीस ठाण्याचे कामकाज अद्ययावत आहे का? हद्दीमध्ये गुन्हेगारी रोखण्यासाठी कोणती मोहीम राबविली, यासह अन्य कामांची झाडाझडती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी बुधवारपासून सुरू केली.
पोलीस मुख्यालय, पोलीस उपअधीक्षक कार्यालयासह २९ पोलीस ठाण्यांची झडती घेणार आहेत. नांगरे-पाटील यांच्याकडून होणाऱ्या या तपासणीचा ‘धसका’ बहुतांश पोलीस ठाण्यांनी घेतला असून, वर्षभरातील कामचुकार कर्मचारी आता रात्रं-दिवस काम करताना दिसून येत आहेत; तर वर्षभर ‘हत्तीच्या चाली’प्रमाणे कामकाज करणाऱ्या काही पोलीस ठाण्यांनी कारवाईचे कागद रंगविण्यासाठी बनावट छापे टाकण्याचे काम सुरू केले आहे.जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा नेहमी सतर्क असते. वर्षभरात केलेल्या कामाचा लेखाजोखा करण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक नांगरे-पाटील स्वत: सर्व पोलीस ठाण्यांना बुधवारपासून भेटी देऊन पाहणी व तपासणी करणार आहेत.
नांगरे-पाटील यांनी कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण, आदी कार्यक्षेत्रांतील कामकाज पारदर्शक करण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील सामाजिक, भौगोलिक व राजकीय परिस्थितीची त्यांना चांगली ओळख आहे. त्यामुळे २९ पोलीस ठाण्यांच्या कामकाजात काही त्रुटी आढळून येऊ नयेत, यासाठी ठाण्याचे प्रमुख स्वत:हून लक्ष घालून अपुरे काम पूर्ण करून घेत असताना दिसत आहेत.
पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी सर्व पोलीस उपअधीक्षक, मुख्यालयातील सर्व विभागांसह पोलीस ठाण्यांना लेखी पत्र पाठविले आहे. त्यामध्ये मागील लेखातपासणी अनुषंगाने रोजकीर्द नोंदवा, महत्त्वाची कागदपत्रे, बँक पासबुके अद्ययावत ठेवावीत.
बँक शिल्लक रकमेप्रमाणे रोजकिर्दीशी ताळमेळ करावा, दरमहा शिल्लक रकमेचा आढावा घेतल्याच्या नोंदी ठेवाव्यात, चलनाने जमा करण्यात आलेल्या महसुली जमेची पडताळणी करण्यात यावी, सर्वप्रकारची दंड वसुली सुरू आहे किंवा नाही याची पडताळणी करावी, आपली तपासणी लावल्यास तपासणी पथकास माहिती उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना केल्या आहेत.