कोल्हापूर : प्रकाश आवाडे पक्षात ज्येष्ठ असल्यामुळे उमेदवारी मागण्याचा हक्क आहे. त्यांना मेरिटनुसार उमेदवारी मिळाला हवी होती. मात्र, महादेवराव महाडिक यांच्याशी आघाडीचा घोटाळा केल्यामुळेच पक्षाने प्रकाश आवाडे यांची उमेदवारी कापली आहे, असे आपल्या खास शैलीत कॉँग्रेसचे ज्येष्ठ माजी मंत्री व आमदार पतंगराव कदम यांनी शनिवारी सांगितले. येथील ‘ड्रीमवर्ल्ड’मध्ये विधानपरिषदेचे कॉँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांच्या प्रचारार्थ बैठक झाली. त्यावेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.कदम म्हणाले, विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी कॉँग्रेस पक्षातून जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी मंत्री प्रकाश आवडे, महादेवराव महाडिक इच्छुक होते. काँग्रेसची उमेदवारी मागण्यासाठी तिघेही आले. त्यावेळी मी तिघांनाही सांगितले की, तुमची स्वतंत्र ताकद आहे तर आघाडी करून कशाला मागता? वैयक्तिक मागा, असे मी सुनावलो होतो. मात्र, तिघांपैकी कोणालाही द्या; पण बंटी पाटील यांना नको, असे आघाडीचा घोटाळा करून तिघेही सांगत राहिले. त्यामध्ये मेरिट असतानाही प्रकाश आवाडे यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कॉँग्रेसला प्रामाणिकपणे मदत केली नाही. आत एक आणि बाहेर एक अशी भूमिका घेतली. त्यामुळे महादेवराव महाडिक यांनाही उमेदवारी पक्षाने नाकारली. समरजित घाटगे म्हणाले, राजे गट यापूर्वीही सतेज पाटील यांच्या पाठीशी होता. आताही राहणार आहे. त्यांना ‘माजी आमदार’ असे म्हणतात याची खंत वाटत होती. ते आता विधानपरिषदेत निवडणुकीत निवडून येऊन आमदार होतील. माजी राज्यपाल डी. वाय पाटील म्हणाले, पक्षावर निष्ठा ठेवून चांगले काम केले. त्याची दखल घेतल्यामुळे उमेदवारी मिळाली आहे.जनसुराज्य पक्ष, शाहूवाडी आघाडी, राष्ट्रवादी, अपक्ष या सगळ्यांचा पाठिंबा मिळाला आहे. यावेळी नगराध्यक्षा विद्या पोळ, राजीव आवळे, माजी मंत्री रमेश बागवे, मदन कारंडे, राजू लाटकर यांची भाषणे झाली. यावेळी कॉँग्रेस, राष्ट्रवादीसह जिल्हा परिषदेचे अपक्ष सदस्य, नगरसेवक उपस्थित होते. प्रल्हाद चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. मुश्रीफ बनेल...मुश्रीफांना महानगपालिकेच्या सत्तेत झुकते माप दिले आहे. ते बनेल असल्यामुळेच कागलच्या कट्ट्यावरून आपल्या कर्तृत्वाने जिल्ह्याचे नेतृत्व करीत आहेत, असा टोला कदम यांनी लगावताच हशा पिकला.राष्ट्रवादी काँग्रेसचे पिल्लू...राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील वादामुळे सत्ता जाईल आणि नंतर चटके बसतील, असे मी सांगत होतो. आता तसेच झाले आहे. या निवडणुकीतही मुश्रीफ यांनी शब्द खरा ठरवत सतेज पाटील यांना निवडून आणण्यासाठी ताकद लावावी. राष्ट्रवादी काँग्रेसचेच पिल्लू आहे, असाही टोला कदम यांनी लगावला. जयंत पाटलांना सांगा...राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र राहणे आवश्यक आहे, असे कदम यांनी सांगितले. त्यावेळी मुश्रीफ यांनी ‘जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला सत्तेत घेण्यास सांगावे,’ असे सांगितले. यावर कदम यांनी ‘सांगलीत जयंत पाटील यांना अगोदर तसे सांगावे,’ असे सांगितले.
महाडिकांच्या आघाडीमुळे आवाडेंना डावलले
By admin | Published: December 12, 2015 12:56 AM