लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे त्रोटक अत्यावश्यक सेवा वगळता सर्वचजण घरात असल्याने घरगुती वीज वापरातही भरमसाठ वाढ झाली आहे. उद्योगधंदे बऱ्यापैकी बंद असल्याने शिल्लक राहणारी वीज घरगुतीकडे वळविल्याने महावितरणने एप्रिल महिन्यातील वीज मागणीची सर्वोच्च पातळी गाठली आहे. जिल्ह्यातील ११ लाखांवर ग्राहकांना रोज २२ हजार मेगावॅट वीज लागत आहे. दुपारच्या वेळी तर यात आणखी एक हजारांनी वाढ होऊन ती २३ हजार मेगावॅटवर जात आहे. म्हणजे उद्योगधंदे, दुकाने बंद राहिली तरी घरगुती वापर वाढल्याने आताही २२ हजार मेगावॅटची मागणी कायमच आहे.
साधारणपणे दरवर्षी उन्हाळ्यात विजेची मागणी वाढतच असते. पण गेल्या वर्षी आणि आताही एप्रिल महिन्यात कडक लॉकडाऊन झाल्याने लोकांना घरातच बसावे लागले आहे. उद्योगधंदे बंद झाल्याने मागणी घटेल अशी शक्यता होती, पण सध्या उन्हाळ्यामुळे घरगुती विजेच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. शिवाय अत्यावश्यक सेवांसह कोविड नियमावलीचे पालन करून काही उद्योगधंदे सुरू आहेत. शिवाय सकाळी ७ ते ११ या वेळेत दुकाने उघडण्यास मुभा असल्याने विजेचा वापर सकाळच्या टप्प्यात नियमितपणे सुरू आहे.
लॉकडाऊनमुळे सकाळी ११ पासून सक्तीने घरी बसावे लागत असल्याने घरगुती ग्राहकांकडून विजेचा वापर वाढला आहे. दिवसभर आणि रात्रीही फॅन, एसी, कुलर लावण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. शिवाय घरातील इतर इलेक्ट्रीक वस्तूचाही वापर वाढला आहे. शिवाय आयपीएल सुरू असल्याने टीव्ही पाहण्याचाही कालावधी वाढला आहे. या सर्वांमुळे वाणिज्यीक, औद्योगिक वापर घटला तरी त्याची कसर घरगुतीने पूर्णपणे भरून काढल्याचे दिसत आहे.
चौकट ०१
जिल्ह्यातील वीज ग्राहक
एकूण ११ लाख २९ हजार ५०५
घरगुती : ८ लाख ५६ हजार २०३
वाणिज्यीक : ७८ हजार ४२
औद्योगिक : २० हजार ७४३
शेतीपंप : १ लाख ४६ हजार ९०३
पाणीपुरवठा : २९९२
दिवाबत्ती : ३३९४
इतर १८ हजार ८८७
चौकट ०२
थकीत वीज बिल वसुलीला ब्रेक
गेल्या लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिलांच्या वसुलीची मोहीम महावितरणकडून आक्रमकपणे राबविली जात होती. कृषी वगळता ३८७ कोटी ३० लाखांच्या थकबाकीपैकी २२२ कोटी ४३ लाख रुपयांची वीज बिल वसुली मार्चअखेरपर्यंत झाली आहे. अजूनही १६८ कोटी ८७ लाखांची थकबाकी वसुली शिल्लक आहे. ही सुरू असतानाच कोरोना वाढल्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन सुरू झाल्याने या वसुली मोहिमेला बऱ्यापैकी ब्रेक लागल्याची परिस्थिती आहे.
महावितरण सज्ज
उष्मा प्रचंड आहे. विजेची मागणीही वाढली आहे. लोक घरातच बसून टीव्ही, फॅन, कूलर, वॉशिंग मशिनपासून इंटरनेटपर्यंत सर्व साधने वापरत आहेत. परंतु तरीही महावितरणकडून अपवाद वगळता वीजपुरवठा नियमित होत आहे.