आजरा तालुक्यात गेल्यावर्षी ढगाळ वातावरण व धुक्यामुळे काजूचा मोहोर गळाला होता. त्यामुळे उत्पादनात घट झाली होती. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थचक्रावर झाला होता. त्यातच कोरोनामुळे लाॅकडाऊनमुळे रोजगाराअभावी कर्जबाजारी होण्याची वेळ आली, तर काजूबियांवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना टांझानिया व बेनीनच्या काजूवर अवलंबून राहावे लागले. आजऱ्याच्या काजूगराला महाराष्ट्रासह गोवा, दिल्ली, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेशात मागणी आहे. उत्पादित होणारा माल मोठ्या प्रमाणात बेकरी व्यवसायासाठी वापरला जातो.
गेल्या आठ ते दहा वर्षांत काजूचा वाढलेला दर, जंगली प्राण्यांकडून होणारे ऊस, भात, नाचणा पिकांचे नुकसान यामुळे काजूचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. चालू वर्षी काजूच्या उत्पादन वाढीसाठी झालेला चांगला पाऊस, उष्ण व दमट हवामान, ढगाळ व धुके नाही. त्यामुळे काजूबागा मोहराने फुलून गेल्या आहेत.
तीन वर्षांपासून काजू बी चा दर १०० रुपयांच्या पुढे गेला आहे. अन्य पिकांच्या तुलनेत शेतकऱ्यांना हा दर परवडणारा आहे. तर काजूगराला गेल्यावर्षी ६०० ते १००० रुपयांपर्यंतचा दर मिळाला आहे.
काजूप्रक्रिया उद्योगांची संख्याही वाढली
दहा वर्षांपूर्वी १० ते १५ काजूप्रक्रिया उद्योग तालुक्यात होते. काजूगराला मिळणारा दर व वर्षभर मिळणारा रोजगार यामुळे सध्या १२० ते १३० काजूप्रक्रिया उद्योग तालुक्यात सुरू आहेत. तर १० ते १२ हजार महिलांना रोजगार मिळाला आहे.
काजूच्या ४ हजार मे. टन उत्पादनाची शक्यता
खराब हवामानामुळे गेल्यावर्षी १६०० ते १८०० मे. टन काजूबिया तालुक्यातून मिळाल्या होत्या. चालू वर्षी पोषक वातावरणामुळे त्यामध्ये वाढ होऊन ४००० ते ४२०० मे. टन उत्पादन होईल, अशी माहिती सेवानिवृत्त कृषी अधिकारी मनोहर पाटील यांनी दिली.
फोटो कॅप्शन - आजरा तालुक्यात मोहोराने बहरलेली काजूची झाडे.
१३ आजरा काजूबाग