कोल्हापूर : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अशी आघाडी झाली की मतदार पाडापाडीचे राजकारण करतात. त्यात चेअरमन निवडीवेळी बोटे मोजली जातात, हा जिल्हा बँकेच्या चेअरमन निवडीवेळीचा कटू प्रसंग अनुभवला आहे. त्यामुळेच बाजार समिती निवडणुकीत काँग्रेसशी फारकत घेतल्याची माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकातून दिली. ‘फसवणूक’ व ‘विश्वासघात’ हे शब्द आमच्या शब्दकोशात नसल्याने फसवणूक केल्याचे पी. एन. पाटील यांनी केलेले वक्तव्य चुकीचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ‘गोकुळ’मध्ये आमची शक्ती कमी आहे तसेच विधानसभा निवडणुकीत आमच्याकडून काही ‘शब्द’ गेले होते. त्यामुळे साडेसहाशे मते असताना फक्त एकाच मागासवर्गीय जागेवर तडजोड केली व प्रामाणिकपणे पॅनेलला सहकार्य केले. त्याचवेळी आमदार महादेवराव महाडिक यांनी जिल्हा बँकेत सहकार्य करण्याचा ‘शब्द’ दिला होता, तोही त्यांनी पाळला. जिल्हा बँकेची परिस्थिती व कलम ८८ ची चौकशीमुळे ठेवीदारांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून कमी जागा घेऊन आम्ही बँकेच्या निवडणुकीत तडजोड केली. बाजार समितीच्या निवडणुकीबाबतही पाटणा येथील अधिवेशनाला जाण्यापूर्वी आम्ही पी. एन. पाटील यांच्याशी चर्चा केली पण संजय घाटगे यांच्याबरोबर चर्चा झाली असून त्यांनी सहा जागांची मागणी केली. पुन्हा ११ जूनला आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. राष्ट्रवादी-जनसुराज्य पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत त्यांची मागणी मांडली, पण सहा जागा देणे अशक्य होते. आम्ही करवीरमधील दोन जागा देण्याची तयारी दर्शवली. माघारीच्या सकाळी दहा वाजता के. पी. पाटील व आपण ‘पी. एन’ यांच्या निवासस्थानी जाऊन तालुकावार मते व वस्तुस्थितीबद्दल चर्चा केली, तरीही ते सहा जागांवर ठाम राहिले, काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाला दोन जागा घ्या व पॅनेलमध्ये या असे सांगण्याचे धाडस आमचे नव्हते, म्हणून त्यांना माघारीसाठी चार तास वेळ असताना सन्मानपूर्वक पत्राने कळविण्यात आले. संजय घाटगे व इतर मंडळी त्यांच्यासोबत असल्याने त्यांची अडचण होणार नाही, असे आम्हाला वाटले, पण आगामी मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान मिळावे व त्यामध्ये कोणाचा रोष पत्करायला नको, यासाठी शिवसेना व मित्रपक्षांनी पॅनेल केले, त्यात आमचा दोष नसल्याचेही पत्रकात म्हटले आहे.
पाडापाडीच्या राजकारणामुळेच काँग्रेसशी फारकत : मुश्रीफ
By admin | Published: June 15, 2015 12:45 AM